दहावीच्या विद्यार्थिनीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
विकास माने (बीड):
सध्या राज्यभरात 10वीची बोर्ड परीक्षा (SSC) सुरू आहे. दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार की ऑफलाईन हा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांनाही पडला होता. अखेर निर्णय आला आणि परीक्षा ऑफलाईन (offline Exams) स्वरूपात सुरू झाल्या. जरी ह्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्र (Exam centre) विद्यार्थी शिकत असलेली त्यांचीच शाळा असली तरी सुमारे 2 वर्षे ऑनलाईन शिक्षण ग्रहण केलेल्या विद्यार्थ्यांना लिखीत स्वरूपात परीक्षा देणे कठीण जात आहे असं म्हटलं जातंय. त्यातच आता बीडमधून (beed) एक धक्कादायक घटना समोर येतेय.
दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय विद्यार्थीनीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे. सृष्टी रोहिदास काळे असं मृत विद्यार्थिनीचे नाव असून सृष्टीची सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. बीडच्या छत्रपती कॉलनीत (Chhatrapati colony) ती मामाकडे वास्तव्यास होती. तिचे आणखीन तीन विषयाचे पेपर शिल्लक आहेत. रात्रीच्या सुमारास घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सृष्टीचा मृतदेह आढळला. नातेवाईकांनी पोलिसांना घटना सांगितल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी सृष्टीचा मोबाईल जप्त केलाय. सृष्टीची हत्या आहे की आत्महत्या याचा तपास शिवाजीनगर पोलीस (Shivaji Nagar Police) करीत आहेत. परीक्षा सुरू असतानाच मृतदेह आढळल्याने बीडमध्ये खळबळ माजली आहे.