Russian Ukraine war | रशिया-युक्रेन युद्धात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती
रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खार्कीव्हमध्ये रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात भारतीय मुलाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील माहिती परराष्ट्र मंत्रालयानेच दिली आहे.
गेल्या सलग सहाव्या दिवशी रशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ले सुरुच आहे. किव्ह आणि खार्कीव्ह या पूर्वेकडील प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन लष्कराकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत.यासाठी हवाई तसेच जमीनीवर लष्कराकडून सुरु असणाऱ्या गोळीबारामध्ये एका भारतीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय. खार्कीव्हमध्ये रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात हा भारतीय मुलगा मरण पावलाय.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन देताना सांगितले. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी, "अत्यंत दु:खाने आम्ही या वृत्ताला दुजोरा देत आहोत की एका भारतीय विद्यार्थ्याचा खार्कीव्ह येथे आज सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झालाय. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुबाच्या संपर्कात आहे," असं म्हटलंय.
परराष्ट्र मंत्रालयाचे परदेश सचिवांनी रशिया आणि युक्रेनमधील राजदूतांना फोनवरुन संपर्क केला आहे. भारतीयांना या युद्धग्रस्त शहरांमधून बाहेर काढण्यासाठी तातडीने सेफ पॅसेज उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी भारताकडून करण्यात आलीय, असंही बागची म्हणालेत.