राम मंदिर भूमिपूजन वर्धापनदिन; २०२३ मध्ये भक्तासांठी खुलं होणार मंदिर
अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाचा आज पहिला वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त महापूजा आणि इतर धार्मिक विधींच्या कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं आहे. याबाबत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून अधिकृतरित्या कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास आणि राज्याच्या माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आता डिसेंबर २०२३ पासून प्रभू रामाचे दर्शन घेऊ शकणार आहेत. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची पायाभरणी केली होती, तेव्हापासून मंदिराला मूर्त स्वरूप देण्यास सुरुवात झाली.
गेल्या वर्षी ५ ऑगस्टला ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन केले होते, तिथेच ही खास पूजा होणार असल्याची माहिती मिळतेय. विशेष हवन, कलश स्थापना, समृद्धी-भरभराटीसाठी एक विशेष पूजा केली जाणार आहे. तसेच महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रमही येथे संपन्न होईल. सत्येंद्र दास म्हणाले, की "भगवान श्रीरामांच्या मूर्तीला नवीन वस्त्र नेसवण्यात येतील आणि इतर सजावट केली जाईल." ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल म्हणाले की, "कार्यक्रम गेल्या वर्षीप्रमाणे भव्य होणार नसून करोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट हे बांधकाम कार्याला गती देणे आणि दिलेल्या वचनाप्रमाणे ३६ महिन्यांच्या आत बांधकाम पूर्ण करणे हे आहे.
"आम्ही भूमिपूजनाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी योजना आखत आहोत. परंतु याबाबत सर्व गोष्टी ट्रस्ट ठरवणार आहे. या उत्सवाचे स्वरूप नक्की काय असेल हे मी सांगू शकत नाही, पण उत्सव होणार एवढं मात्र नक्की. राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा तर ते येण्याची शक्यता आहे. परंतु या कार्यक्रमाबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही," असे सत्येंद्र दास यांनी सांगितले.