रशियातील निवडणूकीत पुतीन यांचा निर्विवाद विजय !
रशियातील संसदीय निवडणूकीत अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्या पक्षाला निर्विवाद विजय मिळाला आहे. त्यामुळे संसदेवरकील पुतीन यांची पकड अधिकच घट्ट झाली आहे.
निवडणूकीत पुतीन यांच्या युनायटेड रशिया पार्टीला 49.7 टक्के मते मिळाली आहेत. तर पुतीन यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या कम्युनिस्ट पार्टीला जेमतेम 20 टक्के आणि लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ रशियाला 7.5 टक्के मते मिळाली असल्याचे निवडणूक आयगाच्या निकालांमध्ये म्हटले आहे. अजूनही निवडणूकीचे अंतिम निकाल जाहीर होणे बाकी आहे. मात्र आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार युनायटेड रशिया पक्षाचा निर्विवाद विजय निश्चित आहे.
या निवडणूकीदरम्यान विरोधकांवर आणि प्रसिद्धी माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध असल्याने ही निवडणूक केवळ एक देखावाच असल्याची टीका केली जाऊ लागली आहे. 2016 मध्ये झालेल्या संसदीय निवडणूकीत पुतीन यांच्या पक्षाला जेवढी मते मिळाली होती, त्यापेक्षा फारच थोड्या मतांची घट यावेळी झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.