PNB घोटाळ्याप्रकरणी फरार मेहुल चोक्सीला अटक
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणातील घोटाळेबाज मेहुल चोक्सी गेल्या काही दिवसांपासून अँटिग्वामधून गायब झाला होता. त्याला डॉमिनिकामध्ये ट्रेस करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आता अँटिग्वा पोलिसांनी डॉमिनिका प्रशासनाशी संपर्क साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंजाब नॅशनल बँकेच्या १४ हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेला मेहुल चोक्सी बेपत्ता झाला होता. मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करण्याबाबत केंद्र सरकार आणि अँटिग्वा सरकारमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, याचा अंदाज आल्यामुळे मेहुल चोक्सी अँटिग्वामधून पसार झाल्याचे सांगितले जात होते.
पीएनबी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मेहुल चोक्सीने भारतातून पळ काढत अँटिग्वा आणि बाबुर्डा या देशांमध्ये लपला होता. अँटिग्वा येथील स्थानिक वृत्त एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, मेहुल रविवारपासून बेपत्ता आहे. रविवारी २३ मे रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी चोक्सी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला होता. तेव्हापासून तो त्या ठिकाणी नाही त्यामुळे पोलिसांनी चोक्सीचा शोध सुरू केला आहे. गुरुवारी डॉमिनिकामध्ये चोक्सी असल्याची खबर मिळाली आणि पोलिसांनी लगेचच कारवाई केली. तो बोटीतून पळाला होता.