West Bengal Election | निवडणुकीत प्रचार यात्रा रद्द करण्याचे कार्ड गाजतेय; आता पंतप्रधानांचा दौरा रद्द
पश्चिम बंगाल विधानसभा निवणूकीत आता प्रचार यात्रा रद्द करण्याचे कार्ड रंगतेय. कारण कॉंग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा प्रचार दौरा रद्द केला आहे. देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या घेण्यात येणारी उच्चस्तरीय बैठक असल्याने त्यांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती आहे.
देशात वाढत्या कोरोनाचा कारण पुढे करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल दौऱ्यातील आपले सर्व दौरे रद्द केले. त्यांनतर तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आपली प्रचार यात्रा रद्द केली. यामध्ये निवडणूक असून सुद्धा कोरोना सारखी भीषण परिस्थिती असताना राजकीय नेत्यांनी आपल्या प्रचारयात्रा रद्द केल्या आहेत. यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला पश्चिम बंगाल दौरा रद्द केला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत प्रचारयात्रा रद्द करण्याचे कार्ड खेळवले जात आहे.
देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या उच्चस्तरीय बैठक आयोजित केली असल्याने हा दौरा रद्द केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. सातव्या आणि आठव्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाणार होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.
पश्चिम बंगालमध्ये पाच टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्या आहेत. आज निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला. २६ एप्रिलला, सातव्या टप्प्यात ५ जिल्ह्यातल्या ३६ जागांसाठी मतदान होईल. तर आठव्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला होणार आहे.