मुंबईच्या विमानतळाबाहेरील गर्दी नियंत्रणाबाहेर, अनेकांची झाली फ्लाईट मिस
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी गोंधळ पहायला मिळाला. प्रवाशांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. या गैरव्यवस्थापनाचा फटाका प्रवाशांना बसत आहे. अशातच विमानतळाचे प्रवेशद्वार आणि चेक इन काउंटरवर कमी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याने लांबलचक रांगा लागल्या आहेत. हळूहळू या रांगा इतक्या वाढल्या की विमान सुटण्याची वेळ झाली, तरी प्रवाशांना आत प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी सुरक्षारक्षक आणि विमानतळ व्यवस्थापकांना जाब विचारण्यास सुरुवात केली.
काही जणांनी तर 'क्यू लॉक' तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याच दरम्यान 6E5731 हे विमान मुंबई हैदराबाद नियोजित होते. परंतु, १५ हून अधिक प्रवाशांना वेळेआधी पोहोचता न आल्याने त्यांना न घेताच विमान निघून गेले. अन्य १५ ते २० प्रवाशांसोबतही असाच प्रकार घडला. त्यामुळे गोंधळलेल्या प्रवाशांनी धावाधाव सुरू केली. त्यामुळे काहीकाळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाल्याची माहिती विमानतळावरील सूत्रांनी दिली.
येत्या २० ऑक्टोबरपासून टर्मिनल १ खुले होणार आहे. तोपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचे विमानतळावरील सूत्रांनी सांगितले. या अनागोंदी कारभाराचा फटका प्रवाशांसह विमान सेवेलाही बसला. प्रवाशांचे चेकइन वेळेत पूर्ण होत नसल्याने नियोजित विमाने ३० ते ४५ मिनिटे उशिराने उड्डाण घेत होती.