घरच्याघरी तयार करा फणसाचे तळलेले गरे; जाणून घ्या रेसिपी...
कोकणातील निसर्ग जसा स्वर्गाची अनुभूती देणारा आहे. येथील निसर्गात कमालीची विविधता आढळून येते. प्रत्येक पट्ट्यात निसर्गाचं एक आगळे वेगळे रूप आपणास पाहावयास मिळते. कोकणातील माणूस हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गात वेगवेगळ्या ऋतूत मिळणाऱ्या विविध नैसर्गिक भाज्या, कंदमुळे, फळभाज्या यांचा समावेश कोकणी माणसाच्या जेवणामध्ये असतो. अशातच आपण आज पाहणार आहोत फणसाच्या तळलेल्या गरांची रेसिपी.
फणसाच्या गऱ्यांसाठी लागणारे साहित्य:
कच्च्या फणसाचे गरे (ताजा फणस घेणे)
तळणीसाठी खोबरेल तेल
1/2 वाटी मिठाचे पाणी
कृती:
कच्च्या फणसाचे गरे त्यातील बिया काढून गरे वेगळे करून घ्यावे.
नंतर हे गरे लांब पातळ चिरून घ्या.
सर्व गरे चिरून झाल्यानंतर ते एका कापडावरती दहा ते पंधरा मिनिटे सुकण्यासाठी पसरवून ठेवा. (यामुळे गरे तळताना जास्त वेळ लागणार नाही.)
गॅसवर मध्यम आचेवर कढईमध्ये खोबरेल तेल गरम होण्यास ठेवा.
तेल तापल्यानंतर त्यामध्ये गऱ्याची एक पाकळी टाकून पहा तेल योग्य तापले असेल तर त्याचा तुम्हाला अंदाज येईल.
आता कढईमध्ये गरे तळण्यास टाका, गरे तळताना त्यामध्ये बनवलेले मिठाचे पाणी दोन-दोन चमचे टाका.
गरे छान लालसर होईपर्यंत तळून घ्या.
तळलेले फणसाचे गरे तयार होतील.
हे गरे तुम्ही पेपर किंवा टिशू पेपर वरती ठेवू शकता ज्यामुळे त्याच्यावरचे एक्स्ट्राचे तेल निघून जाईल. आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या.