दीड, पाच, सात किंवा दहाव्या दिवशीच का केले जाते गणेशमूर्तीचे विसर्जन? गौरींचे विसर्जन कोणत्या दिवशी होते?

दीड, पाच, सात किंवा दहाव्या दिवशीच का केले जाते गणेशमूर्तीचे विसर्जन? गौरींचे विसर्जन कोणत्या दिवशी होते?

सहसा गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत १० दिवस बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान होतात. काही जण दीड दिवस, काही जण पाच दिवस , काही जण सात तर काही जण दिवसांनी गणरायाचं विसर्जन करतात.
Published by :
Team Lokshahi
Published on

सहसा गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत १० दिवस बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान होतात. काही जण दीड दिवस, काही जण पाच दिवस , काही जण सात तर काही जण दिवसांनी गणरायाचं विसर्जन करतात. असे करण्यामागे काही कारण आहे का?

दीड दिवसाच्या बाप्पाची गोष्ट

सर्वांना गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साहात सहभाही व्हायचं असतं; पण सध्या नोकरी, शाळा-महाविद्यालय आणि इतर धावपळीमध्ये अनेक जण फक्त दीड दिवसात गणपतीचं विसर्जन करतात. पण, ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामागील कारण वेगळं आहे आणि त्याचा संबंध शेती आणि शेतकऱ्यांशी जोडला जातो. चला तर मग जाणून घेऊया दीड दिवसाच्या बाप्पाची गोष्ट

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाबाबत प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी एक गोष्ट सांगितली. भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीदरम्यान शेतांमध्ये धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी धरणीमातेचे आभार मानण्याची पद्धत आहे. धरणीमातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यापूर्वी बांधावरच गणरायाची मातीची मूर्ती तयार करून, तिची पूजा केली जात असे. सुरुवातीला पूजा झाल्यानंतर त्याच दिवशी या मूर्तीचं नदीमध्ये विसर्जन केलं जात असे. पण, नंतर काळानुसार या परंपरेमध्ये बदल होऊ लागला. काही जण सुबक मूर्ती तयार करून घरी आणू लागले आणि तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर मूर्ती नदीत विसर्जन करीत. हळूहळू दीड दिवसाच्या गणपती पूजनाची पद्धत सुरू झाली. पण, अजूनही अनेक गावांमध्ये चतुर्थीच्या दिवशीच गणेशमूर्तीचं विसर्जन करतात. अजूनही काही ठिकाणी ही प्रथा कायम आहे.

पाचव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यामागचे कारण

याबाबत अवधूत शेंबेकर गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर त्याची पूजा करून विसर्जन करण्याचे हे व्रत एक किंवा दीड दिवसाचे आहे. पण, उत्सवात आणखी रंगत आणण्यासाठी किंवा कित्येक जण नवस पूर्ण करण्यासाठी पाच दिवस, सात दिवसांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. त्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही. गणेशभक्त आपल्या हौसेनुसार गणेशमूर्तीचे विसर्जन पाचव्या किंवा सातव्या किंवा दहाव्या दिवशी करतात.

बऱ्याच लोकांना वाटते की, गणेशाची प्राणप्रतिष्ठापना फक्त चतुर्थीलाच होते; तर तसे नाही. काही ठिकाणी प्रतिप्रदेला गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत असे १० दिवस हा उत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत असे १० दिवस गणेशोत्सव साजरा होतो.

गौरींचे विसर्जन कोणत्या दिवशी होते?

काही जणांकडे पाचव्या दिवशी गौरीसह गणेशमूर्तीचेही विसर्जन केले जाते; तर काही जणांकडे पाचव्या दिवशी गौरीचे विसर्जन झाल्यानंतर, सातव्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. याबाबत शेंबेकर गुरुजी यांनी सांगितले की, गौरी आणि गणपती वेगवेगळ्या देवता आहेत. गौरीचे आगमन आणि विसर्जन हे नक्षत्रानुसार होते. ज्या नक्षत्रामध्ये त्यांचे आगमन होते, त्याच्या पुढच्या नक्षत्राला त्यांचे विसर्जन होते. अनुराधा नक्षत्राला गौरीचे आगमन होते आणि मूळ नक्षत्राला तिचे विसर्जन होते. नक्षत्र कधी कधी पुढे-मागे होतात; त्यानुसार कधी हे विसर्जन पाचव्या दिवशी होते; तर कधी सातव्या दिवशी होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com