पापंकुशा एकादशीचे व्रत केल्यास मिळतो मोक्ष; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी
Papankusha Ekadashi 2023 : अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला पापंकुशा एकादशी म्हणतात. एका वर्षात एकूण २४ एकादशी येतात, त्यापैकी पापंकुशा एकादशी. मान्यतेनुसार या एकादशीचे व्रत केल्यास पापांपासून मुक्ती मिळते. असे म्हटले जाते की जो भक्त श्री हरीसाठी पापंकुशा एकादशीचे व्रत पाळतो आणि पूजा योग्य प्रकारे करतो, त्याला 100 सूर्ययज्ञ आणि एक हजार अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते. या एकादशीची पूजा केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. जाणून घ्या यावर्षी पापंकुशा एकादशी पूजा कशी करतात?
पापंकुशा एकादशी शुभ मुहूर्त
यावर्षी आश्विन महिन्यात 25 ऑक्टोबर, बुधवारी पापंकुशा एकादशी साजरी होत आहे. या दिवशी एकादशीचे व्रत केले जाईल. पंचांगानुसार 24 ऑक्टोबरला एकादशीची तिथी दुपारी 3:14 वाजता सुरू होईल आणि ही तिथी 25 ऑक्टोबरला दुपारी 12:32 वाजता संपेल. त्यामुळे एकादशीचा उपवास 25 ऑक्टोबरलाच केला जाणार असून दुसऱ्या दिवशी 26 ऑक्टोबरला उपवास सोडला जाणार आहे. एकादशीची पूजा केव्हाही करता येते पण या दिवशी राहुकालही पडतो आणि राहुकालात एकादशीची पूजा केली जात नाही. राहुकाल दुपारी १२:०५ ते १:२९ पर्यंत असेल. या शुभ मुहूर्ताव्यतिरिक्त इतर दिवशी एकादशीची पूजा करता येते.
पापंकुशा एकादशीची पूजा पद्धत
पापंकुशा एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करतात. यानंतर मंदिरात दिवा लावला जातो. भगवान विष्णूवर गंगाजल शिंपडावे आणि फुले व तुळशीची पाने भगवान विष्णूला अर्पण करावी. या दिवशी उपवास करणारे भक्त भगवान विष्णूची पूजा करून आरती करतात आणि दिवसभर विष्णूच्या ध्यानात मग्न राहतात. भगवान विष्णूला भोजन अर्पण केल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटला जातो. एकादशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करणे देखील शुभ मानले जाते.