ज्येष्ठ गौरी आवाहनाचा जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

ज्येष्ठ गौरी आवाहनाचा जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

राज्यभरात गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. यानंतर आता ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात येते.
Published on

Jyeshtha Gauri Avahana 2023 : राज्यभरात गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. यानंतर आता ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात येते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला म्हणजेच 21 सप्टेंबर 2023 रोजी अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन पाळण्यात येईल. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हंटले जाते. अखंड सौभाग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी ज्येष्ठा गौरी उत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरींचे आगमन, दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.

ज्येष्ठा गौरी पूजा शुभ मुहूर्त 2023

ज्येष्ठा गौरी आवाहन तारीख - 21 सप्टेंबर 2023

ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त - सप्टेंबर - सकाळी 5:35 ते दुपारी 3:35

ज्येष्ठा गौरी पूजन तारीख - 22 सप्टेंबर 2023

ज्येष्ठा गौरी विसर्जन - 23 सप्टेंबर 2023 - सकाळी 06:27 ते दुपारी 2.55

ज्येष्ठा गौरी आवाहन 2023: पूजा विधी

हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. गौरींना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सजावटही करण्यात येते. कोणी फुलांची आरास करतात. तर कोणी दिवे आणि थर्माकॉलच्या मखरात गौरीला बसवतात. गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते. तर खड्याची गौरी पुजण्याचीही रित आहे.

गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात. पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. काही ठिकाणी माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.

काय आहे महत्त्व?

पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणिमात्रांचे दुःख नाहीसे केले. त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठ गौरीचे व्रत करतात. गौरी हे माता पार्वतीचे दूसरे नाव आहे. जेष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो त्यामुळे त्याला जेष्ठा गौरी पूजन म्हटले जाते. ज्येष्ठा गौरी पूजन हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सणांपैकी एक महत्वाचा सण आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com