Jara Jivantika Puja : जरा-जिवंतिका पूजेची कथा; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व
जिवतीची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. श्रावण महिन्यात अनेक सण व्रतवैकल्ये, पूजा अशा कार्यक्रमांना सुरुवात होते. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना. श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे.
जरा जिवंतिका पूजन दर शुक्रवारी करण्याची प्रथा आहे. जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले किंवा काढले जाते. दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले जाते. ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. मग पूजेला बोलाविलेल्या स्त्रियांना हळद कुंकू देऊन जेवू घालावे.
जिवतीचं पूजन केल्याने मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतं असं म्हटलं गेलं आहे. जरा आणि जिवंतिका याचा एक अर्थ जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, अर्थात म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणाऱ्या देवता म्हणून जरा-जिवंतिका पूजन केलं जातं. लहान बालकांच्या रक्षणासाठी जराजिवंतिका पूजन केलं जातं.
जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली.
वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही