धाराशिवमधील 'शिवाकाशी'ने बदललं हजारो तरुणांचे जीवन; तेरखेडा गावचं रुपडं पालटलं
सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे. विविध प्रकारच्या पणत्या, आकाशकंदील आणि दिवाळीत आकर्षणाचा विषय ठरणाऱ्या फटाक्यांनी बाजारपेठादेखील गजबजल्या आहेत. तर अनेक ठिकाणी पणत्या, आकाशकंदील तसंच फटाक्यांची निर्मिती केली जातेय.
धुळे शरातील सोलापूर मार्गालगत वसलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा गावातही फटाक्यांची निर्मिती केली जातेय. गावची लोकसंख्या जवळपास पंधरा हजार आहे. तसंच गावची ओळख म्हणाल तर मराठवाड्यातील फटाके निर्मिती आणि विक्री करणार हे गाव. याच फटाक्यांनी धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा गावचं रूप बदललंय. काही जण या गावाला मराठवाड्याची शिवकाशी असं देखील म्हणतात.
तेरखेडाच्या गुणवत्तापूर्ण आणि अत्यंत कमी दरात मिळणाऱ्या या फटाक्यांना राज्यभरात मोठी मागणी आहे. दिवाळी आली की फटाके खरेदीसाठी तेरखेडा नगरीमध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. तेरखेड्याचे हे फटाके खरेदी करून ग्राहक समाधानी आहेत शिवाय गावात असलेल्या फटाके निर्मितीच्या 30 कारखान्यांमुळे जवळपास दहा हजार तरुणांच्या हातांना रोजगार उपलब्ध झाला असून तरुण आपल्या पायांवर उभे आहेत.
तेरखेडा येथील फटाका व्यावसायिक पिढ्यान् पिढ्यांपासून हा व्यवसाय करत असून पर्यावरणाचे वाढतं प्रदूषण लक्षात घेता पर्यावरणपूरक फटाके निर्मितीवर त्यांचा भर आहे. इथेच तयार होणारा स्पेशल सुतळी बॉम्ब, नर्तकी, माती नाळा या फटाक्यांना देशभरात मोठी मागणी असून, याच फटाक्यांनी यंदाही तेरखेडा गावची बाजारपेठ फुलली आहे. सोबतच दिवसेंदिवस गाव देखील समृध्द होत आहे.