सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा फटका, गॅस सिलेंडरचा दर १००० रुपये होणार
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक अधिकचं त्रस्त आहे. त्यातच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये सातत्याने दरवाढ सुरु आहे. याचा फटकाही सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. ग्राहकांना आता घरगुती एलपीजी सिलेंडरकरिता 1000 रुपये मोजावे लागू शकतात. केंद्र सरकार एलपीजीला मिळणारी सबसिडी बंद करण्याच्या विचारात आहेत. यासंदर्भात अधिकृतरीत्या आदेश काढलेला नसला तरी सरकारच्या आंतरिक मूल्यांकनात ग्राहक एका सिलिंडरसाठी एक हजार रुपये खर्च करण्यास सक्षम असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.
एलपीजी सिलेंडरच्या सबसिडीसंदर्भात सरकारमध्ये दोन विचार आहेत. पहिल्या योजनेत आहे तसे चालू द्यायचे आणि दुसऱ्या योजनेत उज्ज्वला योजनेनुसार आर्थिकदृष्टय़ा कमजोर वर्गालाच सबसिडी द्यायचा विचार आहे. या संदर्भात अद्याप अधिकृत आदेश आला नाही, मात्र सरकारच्या आंतरिक मूल्यांकन अहवालात ग्राहक एका सिलेंडरसाठी एक हजार रुपये मोजू शकतो इतका सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. जानेवारी २०२१ मध्ये एलपीडी सिलेंडरची किंमत ६९४ रुपय़े होती. आता सिलेंडरची ८८४.५० रुपये झाली आहे. त्यामुळे जानेवारीपासून ते आत्तापर्यंत घरगुती गॅस सिलेंडर जवळपास १९०.५० रुपयांनी महागला आहे.
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सरकारने गॅसवरील सबसिडीपोटी (LPG GAS) ३ हजार ५५९ कोटी रुपये ग्राहकांच्या बँक खात्यात वर्ग केले होते. तत्पूर्वीच्या वर्षात म्हणजे २०१९-२० मध्ये हा आकडा २४ हजार ४६८ कोटी रुपये इतका होता. थोडक्यात एका वर्षात सरकारने सबसिडीमध्ये सहापटीने कपात केली आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस (LPG GAS) सिलेंडरवर दिली जाणारी सबसिडी पूर्णपणे बंद करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून यामुळे गॅस सिलेंडरचे दर आगामी काळात एक हजार रुपयांवर जाऊ शकतात, अशी माहिती गुरुवारी सूत्रांनी दिली.