कोरोना व्यवस्थापनाचं ‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; नीती आयोगाची स्तुतीसुमनं

कोरोना व्यवस्थापनाचं ‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; नीती आयोगाची स्तुतीसुमनं

Published by :
Published on

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विविध उपाययोजना करत आणि बेड, रेमडेसिवीर व ऑक्सिजनच्या वाटपात सुसूत्रता आणत मुंबई महापालिकेनं परिस्थितीवर पकड मिळविण्याचे प्रयत्न केले. महापालिकेच्या कोरोना व्यवस्थापनाचं सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ केंद्र सरकारच्या नीती आयोगानेही कौतुक केलं आहे.

दुसऱ्या लाटेचा अचानक उद्रेक झाल्यानंतर परिस्थिती बिकट झाली होती. मात्र, महापालिकेकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. त्याचबरोबर रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसंदर्भात समन्वय प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला.

मुंबईच्या ऑक्सिजन वितरण प्रणालीचं सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केलं. याची चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनीही महापालिका आयुक्तांचं कौतुक केलं आहे.

'केंद्रीय पद्धतीने बेडचं वाटप करणं, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणं, इतकंच नाही तर खासगी रुग्णालयातील बेडचंही वाटप करणं आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणं, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम निर्माण करणं, मुंबईचं करोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमचं अभिनंदन," अशा शब्दात नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी मुंबई महापालिका आणि आयुक्तांचं कौतुक केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com