Nitesh Rane Case | संपुर्ण घटनाक्रम;नितेश राणे यांचा जामिनाचा मार्ग मोकळा; उद्या होणार सुनावणी
शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी प्रमुख संशयित असलेले नितेश राणे गेल्या दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत होते. आज त्यांची कोठडी संपली होती, त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान आज नेमक्या नेमक्या काय काय घडामोडी घडल्या. तसेच नेमका कोर्टात काय युक्तीवाद झाला ? याचाच संपुर्ण घटनाक्रम पाहूयात…
नितेश राणे आणि राकेश परबांची चौकशी सुरू
संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची कसून चौकशी केली जात असून आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आमदार नितेश राणे यांना पोलिस कोठडी संपत असल्याने त्यांना कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले जाणार आहे तर आज राकेश परब यांची ही पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांनाही कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
कोर्टाबाहेर दंगल नियंत्रण पथक तैनात
दिवाणी न्यायालय कणकवली कोर्टाबाहेर दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर काहीही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे.
निलेश राणे न्यायालयात पोहोचले!
आमदार नितेश राणे यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने आज कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी नितेश राणे यांचे धाकटे बंधू निलेश न्यायालयात पोहोचले आहेत.
न्यायालयातला युक्तिवाद संपला
नितेश राणे प्रकरणात कणकवली न्यायालयात सुरू असणारा युक्तिवाद आता संपला आहे. पोलिसांनी नितेश राणे यांची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. काही वेळातच या प्रकरणाचा निकाल जाहीर होईल.
कोठडी वाढवण्याची पोलिसांची मागणी
पोलिसांनी नितेश राणे यांचं मोबाईल, सिमकार्ड जप्त केलं आहे. आरोपीला पुण्याला नेऊन तपास करणं आवश्यक असल्याचं सांगत पोलिसांची नितेश राणे यांची कोठडीची मुदत वाढवून मागितली आहे.
नितेश राणेंना १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी
नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आज न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मुदत वाढवण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळली असून त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता त्यांचा जामिनासाठीचा अर्ज मोकळा झाला आहे.
सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार
पोलीस कोठडीची मुदत वाढवण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळत लावली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता लगेचच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठीचा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे व संग्राम देसाई यांनी दिली आहे.
जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी
कणकवली न्यायालयाने नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावताच लगेचच सत्र न्यायालयात जामिनासाठीचा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राणेंचे वकील सतिश मानेशिंदे आणि संग्राम देसाई यांनी दिली होती. या अर्जावर आता उद्या म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याचं अॅड. संग्राम देसाई यांनी म्हटलं आहे.
नितेश राणेंची तब्येत बरी नाही
नितेश राणेंची तब्येत आधीपासूनच बरी नव्हती. पण ठरल्याप्रमाणे, न्यायालयाच्या आदेशामुळे ते पोलीस कोठडीत गेले होते. पण आता नियमित तपासणी होईल, त्यात डॉक्टरांना जे आढळून येईल, त्यानुसार पुढची कार्यवाही होईल. आम्ही फक्त न्यायालयात नमूद केलं आहे की त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांना उपचाराची गरज वाटली तर उपचार केले जातील. नाही वाटलं तर काही हरकत नाही. न्यायालयाला माहिती द्यायचं आमचं काम होतं, ते आम्ही केलं.
गोव्यात नेऊन नितेश राणेंची चौकशी
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी गुरुवारी गोव्यात नेऊन या गुन्ह्याच्या कटाबाबत चौकशी केली.मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीबाबतचा तपशील मिळू शकला नाही. या हल्लाप्रकरणी त्यांच्यावर कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
निलेश राणेंवरही गुन्हा दाखल
नितेश राणे यांच्या अटकेबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणारे माजी खासदार निलेश राणे हेही कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेकायदा जमाव जमवल्याचा (कलम १८८) आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी (१८६) निलेश राणे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात बुधवारी ओरोस सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाच तास चौकशी
सुमारे दीड महिन्याच्या कायदेविषयक लढाईनंतर नितेश यांना पोलीस कोठडीत ठेवून चौकशी करण्यात बुधवारी संध्याकाळी पोलिसांना यश आले. कणकवली येथील न्यायालयाने त्यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे पोलीस तातडीने तपासाच्या कामाला लागले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार नितेश यांना बुधवारी रात्रीच कणकवलीहून सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कोठडीत हलवण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांना पुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे सकाळी १०.३० वाजल्यापासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत म्हणजे तब्बल पाच तास राणे यांची चौकशी करण्यात आली.
अटक टाळण्याची धडपड आणि शरणागती
नितेश राणे यांनी अटक टाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. स्थानिक न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथेही यश न मिळाल्याने राणे सर्वोच्च न्यायालयात गेले़ होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सक्षम न्यायालयात शरण जाण्याची सूचना केली होती. तसे न करता दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामध्ये नियमित जामीन मिळावा, यासाठी राणे यांनी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने तोही फेटाळला. त्यावर त्यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती मागे घेऊन नितेश हे बुधवारी कणकवली न्यायालयामध्ये शरण आले होते.