Youtube Viewers कमी झाल्याचा धक्का; IIMT च्या विद्यार्थ्यानं केली आत्महत्या
तेलंगणातील हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका यूट्यूबरला त्याच्या व्हिडिओचे प्रेक्षक कमी झाल्याचा एवढा भयंकर धक्का बसला की त्यानं त्या तणावातून थेट आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी एका 23 वर्षीय विद्यार्थ्यानं त्याच्या यूट्यूब चॅनेलच्या दर्शकांची संख्या कमी झाल्यामुळे आत्महत्या केल्य़ाची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे माणसाच्या आयुष्यावर होणाऱ्या सोशल मीडियाच्या वाईट परिणामांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आय.आय.टी.एम. ग्वाल्हेरमध्ये हा तरुण शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी त्यानं निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सैदाबाद पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यानं लिहिलंय की, त्याच्या यूट्यूब चॅनेलवर दर्शकांची संख्या कमी असल्यानं आणि पालकांना करियर संबंधीत सल्ला न दिल्यानं तो निराश झाला आहे.
अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. सध्या तो ऑनलाइन क्लासेसद्वारेच शिक्षण घेत होता. हा विद्यार्थी त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ गेमशी संबंधित व्हिडिओ अपलोड करत असे. पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृताचे वडील रेल्वे कर्मचारी आहेत. बुधवारी रात्री आई-वडील घरी पोहोचले असता त्यांना तो खोलीत झोपलेला दिसला. त्यांनी त्याला उठवलं नाही. मात्र विद्यार्थ्यानं झोपेतून उठून इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तरुणाच्या आईनं दिलेल्या माहितीनुसार, तो एक यूट्यूब चॅनल चालवत होता आणि त्याच्या चॅनलवर प्रेक्षकांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे तो नैराशाच्या गर्तेत गेला होता.