Baba Siddique यांना Y कॅटेगरीची सुरक्षाच नव्हती- गुन्हे शाखेकडून मोठा खुलासा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेने आज कोर्टातील सुनावणी नंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पोलिसांनी एक धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती दिली. बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी आली होती, अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याची माहिती समोर येत होती. तसेच बाबा सिद्दीकी यांना Y दर्जाची सुरक्षा होती, अशी माहिती कालपासून समोर येत आहे. पण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार परिषदेत याबाबत मोठा खुलासा केला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवेळी त्यांना कोणत्याही कॅटेगरीची सुरक्षा नव्हती. तर त्यांच्या सुरक्षेसाठी केवळ 3 पोलीस कर्मचारी तैनात होते, असा मोठा खुलासा गुन्हे शाखेकडून करण्यात आला आहे.
पोलिसांनी काय-काय सांगितलं?
“या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. ही घटना घडल्यानंतर तात्काळ तिथे उपस्थित असणारे पोलीस अधिकारी एपीआय राजेंद्र दाभाडे आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांनी अतिशय धाडस दाखवत घटनास्थळावरुनच दोन आरोपींना पकडण्यात यश मिळवलं आहे. या दोन्ही आरोपींकडे शस्त्र असण्याची शक्यता असल्याची माहिती असतानासुद्धा स्वत:चा जीव धोक्यात घालून एपीआय दाभाडे आणि त्यांच्या टीमने अतिशय कौतुकास्पद कामगिरी करत त्या दोन आरोपींना तात्काळ पकडलं आहे”, असं पोलीस म्हणाले.
‘बाबा सिद्दीकी यांना कोणत्याच कॅटेगरीची सुरक्षा नव्हती’
यावेळी पत्रकारांनी पोलिसांना बाबा सिद्दीकी यांना Y दर्जाची सुरक्षा होती का? असं विचारलं होतं. त्यावर पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांना कॅटेगराईज सुरक्षा नव्हती असं स्पष्ट केलं. “बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तीन पोलीस कर्मचारी तैनात होते. हल्ला झाला त्यावेळी एक पोलीस कर्मचारी तिथे उपस्थित होते”, असं पोलिसांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.