कुस्तीपटू पोलिसांच्या ताब्यात, जंतरमंतरवरून पोलिसांनी हटवले तंबू
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले. अशातच, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनावर मोर्चा काढला होता. यावर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून कुस्तीपटूंना ताब्यात घेतले आहे. तर, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरून कुस्तीपटूंचा तंबूही हटवला आहे.
ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात 23 एप्रिलपासून जंतर-मंतरवर कुस्तीपटूंची निदर्शने सुरु असून आज नव्या संसद भवनाकडे शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. सकाळी 11.30 वाजता कुस्तीपटू नवीन संसद भवनाकडे रवाना झाले. कुस्तीपटूंना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. यावेळी कुस्तीपटूंनी बॅरिकेड्स तोडले. यानंतर पोलिसांनी साक्षी मलिकसह काही कुस्तीपटूंना ताब्यात घेतले.
कुस्तीपटूंनी शांततापूर्ण मोर्चा काढणे हा आपला हक्क असल्याचे सांगितले. व दिल्ली पोलिसांवर देशद्रोही असल्याचा आरोपही केला. पोलिसांनी बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांना ताब्यात घेतल्यानंतर ते रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान, विनेश फोगट यांनी सरकार आपल्यावर तडजोडीसाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता. मात्र यात ब्रिजभूषणच्या अटकेची अट ठेवण्यात आली नाही. म्हणून आम्ही तडजोडीसाठी तयार नाही. नव्या संसदेसमोर महिला सन्मान महापंचायत होणार असल्याचं फोगट यांनी सांगितले होते.