IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला
यंदाच्या आयपीएल हंगामात फलंदाजांनी एकप्रकारे धावांचा पाऊसच पाडण्याचा घाट घातला आहे. शनिवारी जॅक फ्रेजर-मॅकगर्कच्या धडाकेबाज फलंदाजीच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चा सुरु असतानाच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या विल जॅक्सनं रविवारच्या सामन्यात इतिहास रचला. जॅक्सने वादळी खेळी करून ४१ चेंडूत ५ चौकार आणि १० षटकार ठोकून नाबाद १०० धावांची शतकी खेळी केली. जॅक्सच्या तुफानी खेळीमुळं गुजरातच्या खेळाडूंची मैदानात दाणादाण उडाली होती. जॅक्सने धडाकेबाज फलंदाजी करून दहा वर्षांपूर्वीचा ख्रिस गेलचा विक्रम मोडला.
यूनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने २०१३ मध्ये बंगलोरमध्ये पुणे वॉरियर्सविरोधात झालेल्या सामन्यात अशाप्रकारची वादळी खेळी केली होती. अर्धशतक झळकावल्यानंतर पुढच्या पन्नास धावांसाठी गेलने फक्त १३ चेंडू खेळले होते. परंतु, रविवारी विल जॅक्सने हा विक्रम मोडला आणि आयपीएलमध्ये इतिहास रचला.
विल जॅक्सने अर्धशतक ठोकल्यानंतर शतकासाठी लागणाऱ्या पन्नास धावांसाठी जवळपास दहा चेंडू खेळले. जॅक्सनच्या आक्रमक फलंदाजीमुळे २० षटकांमध्ये ४ षटक बाकी असतानाच आरसीबीने २०० धावा पूर्ण केल्या होत्या.