गणपतीला २१ दुर्वांची जुडीच का वाहतात? जाणून घ्या यामागं कारण
कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. जिकडे तिकडे मोठ मोठ्या गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. गणपतीची पूजा करताना गणपतीला आवडत्या दूर्वा आणि जास्वदांची फुलं वाहिली जातात. यात 21 दूर्वांची जूडी गणपतीला वाहिली जाते. दरवर्षी गणेशोत्सवाच्या तयारीत दुर्वांना महत्त्वाचं स्थान असतं.
यामागचे कारण असं की, अनलासूर नावाच्या राक्षसाने ऋषी मुनी आणि देवता यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणपतीने त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली. गणरायाचा त्रास कमी व्हावा यासाठी अनेक ऋषीमुनींनी प्रयत्न केले मात्र कशानेच गणेशाच्या पोटातील दाह कमी होत नव्हता. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिल्या. दुर्वा खाल्ल्यावर गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. यानंतर आनंदी होऊन यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे वरदान गणेशाने दिले होते. याच कारणाने दरवर्षी गणेशोत्सवात गणपतीला दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात.
गणपतीला दूर्वा आणि लाल रंगाची फुलं आवडतात असं सांगितलं जात. त्यामुळे अशा फुलांना प्राधान्य द्यावे. मात्र पूजेमध्ये नेहमीच त्या त्या ऋतुमध्ये मिळणाऱ्या फुलांचा विशेष सुगंधी वनस्पतींचा समावेश करण्यास सांगितला आहे, त्यामुळे जी फुलं उपलब्ध असतील ती वहावीत. या ऋतूमध्ये आघाडा सर्वत्र मिळतो तो वहावा. प्रत्येक देवतेच्या काही संख्या आहेत जसे १२ रवि, ११ रुद्र म्हणजेच शंकर त्याप्रमाणे गणेशाची संख्या २१ आहे म्हणून २१ मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. त्याप्रमाणे याच संख्येमुळे २१ दुर्वांची जुडी किंवा २१ पत्री वाहिल्या जातात.