Work From Home बंद करताच कपंनीच्या 800 कर्मचाऱ्यांनी दिले राजीनामे
दिल्ली : कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या (Covid19) पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी घरून काम सुरू केले तेव्हा असे बरेच कर्मचारी होते ज्यांना घरून काम करणं (Work From Home) कठीण वाटत होतं. पण आता बहुतांश कर्मचाऱ्यांनी घरून काम करणं पसंत केलं आहे. आता अनेक कर्मचारी ऑफिसला जाण्याऐवजी घरून काम करणं पसंत करता आहेत. एका घटनेतून ते दिसून आलं आहे. एका कंपनीने कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम बंद केल्यानंतर तब्बल 800 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.
व्हाईटहॅट ज्युनियर या ऑनलाइन एज्युकेशन कंपनीमध्ये ही घटना घडली आहे. गेल्या दोन महिन्यांत या कंपनीतील 800 हून अधिक कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. कारण, कंपनीने या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' संपवून कार्यालयात येऊन काम करण्यास सांगितले होतं. तेव्हापासून कर्मचारी राजीनामे देत आहेत.
कर्मचारी कार्यालयात जाण्यास तयार नाहीत
मनीकंट्रोलने एका अहवालाचा हवाल्याने सांगितलं की, व्हाईटहॅट ज्युनियरने 18 मार्च रोजी 'वर्क फ्रॉम होम' बंद करण्याची घोषणा केली होती. सर्व कर्मचाऱ्यांना महिनाभरात म्हणजे १८ एप्रिलपर्यंत कार्यालयात येऊन कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सुमारे 800 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. हे कर्मचारी कार्यालयात यायला तयार नव्हते. राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सेल्स, कोडिंग आणि मॅथ टीममधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. येत्या काही महिन्यांत आणखी कर्मचारी राजीनामा देऊ शकतात.
कर्मचार्यांचा कंपनीवर आरोप आहे...
राजीनामा दिलेल्या एका कर्मचार्याने Inc42 ला सांगितलं की, कामावर हजर होण्यास एक महिन्याचा कालावधी पुरेसा नाही. कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कौटुंबिक समस्या असतात. काहींना मुलं आणि त्यांच्या शाळांबाबत समस्या आहेत, तर काहींना आजारी पालक आहेत. याशिवाय इतरही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. इतक्या कमी कालावधीत कार्यालयात हजर होणं शक्य नाही.