ED कारवाईमध्ये अडकलेल्या पार्थ चॅटर्जींची ममता बॅनर्जींनी केली पदावरुन हकालपट्टी
पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी पार्थ चॅटर्जी (Parth Chaterjee) यांना 28 जुलैपासून त्यांच्या विभागांचे प्रभारी मंत्री म्हणून त्यांच्या कर्तव्यातून मुक्त केल्याचं अधिकृत पत्र पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने जाहीर केलं आहे. अर्थातच त्यांची त्यांच्या पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती एनआयने दिली आहे. पार्थ चॅटर्जी यांच्य़ा सहकारी अर्पिता मुखर्जीकडून ईडीने मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या चौकशीत तिच्या इतर काही मालमत्तांचा उल्लेख केला होता. यातील एक फ्लॅट कोलकात्याच्या बेलघारिया येथेही होता. ईडीने या फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यानंतर अर्पिताच्या घरातील टॉयलेटमध्ये काय आढळले हे पाहून ईडीचे अधिकारीही हैराण झाले. अर्पिताच्या घरातून ईडीला 27.9 कोटी रुपये सापडले आहेत. त्यात 2000 आणि 5000 रुपयांच्या नोटांचे बंडल होते. या नोटा 20-20 लाख आणि 50-50 लाखांच्या बंडलमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल सरकारचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना शिक्षक भरती घोटाळ्यात अटक केल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं की, "मी भ्रष्टाचार किंवा कोणत्याही चुकीच्या कामाचं समर्थन करत नाही. जर कोणी दोषी आढळला तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, मात्र माझ्याविरोधात चालवल्या जात असलेल्या मोहिमेचा मी निषेध करते." ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, सत्य बाहेर आलं पाहिजे, पण ठराविक वेळेत आलं पाहिजे. केंद्रीय एजन्सींचा वापर करून भाजपचे लोक माझा पक्ष फोडू शकतील, असा विचार ते करत असतील तर ते चुकीचा विचार करत आहेत.