केडीएमसी हद्दीत ठिकठिकाणी पाणी टंचाईमुळे नागरीक हैराण; महिलांनी रस्त्यावर बसून केला रास्ता रोको
अमजद खान | कल्याण-डोंबिवली: केडीएमसी हद्दीत ठिकठिकाणी पाणी टंचाईमुळे नागरीक हैराण आहेत. अनेकदा आंदोलने केली जातात. असेच एक अनोखे आंदोलन कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली परिसरात आज करण्यात आले. पाण्यासाठी महिलांनी रस्त्यावर बसून रास्ता रोको केला. प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. इतकेच नाही लोकप्रतिनिधी देखील पाण्याच्या मुद्यावर गप्प आहेत असे दिसून येत आहे. कमीत कमी पाण्याच्या मुद्दावर प्रशासनाला धारेवर धरण्याची गरज त्यांना वाटत नाही का असा संतप्त सवाल नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत अनेक अशी ठिकाणो आहे. ज्या ठिकाणी पाणी टंचाई मोठय़ा प्रमाणात आहे. कल्याण ग्रामीणमध्ये भोपर, डोंबिवली पूर्व भागात दावडी आणि खडे गोळवली परिसराला लागून असलेल्या माणोरे पारिसरात मोठया प्रमाणात पाणी टंचाईचा सामना नागरीकांना करावा लागतो. त्याचप्रमाणो नांदिवली सागाव याठिकाणीही पाणी टंचाईची समस्या आहे. महिलांकडून अनेकदा आंदोलन करण्यात आले.
काही दिवसापूर्वी कल्याण पूर्व भागातील टाटा नाका नजीक देशमुख होम्समधील नागरीकांनी पाण्यासाठी रास्ता रोको केला होता. आत्ता कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली परिसरातील 9 आय प्रभाग कार्यालयासमोर महिलांना रस्त्यावर बसून रास्ता रोको केला. या ठिकाणी अनेक दिवसापासून पाणी टंचाई आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. तोही बंद करण्यात आला आहे. पाणी टंचाईच्या मुद्यावर नागरीक सातत्याने आंदोलने करीत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधीची पाणी प्रश्नाविषयीची उदासीनता पाहता पाणी टंचाई दूर होईल असे वाटत नाही.