Wardha: वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात 45,605 मिटर खादीचे उत्पादन

Wardha: वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात 45,605 मिटर खादीचे उत्पादन

वर्ध्यातील सेवाग्राम येथील आश्रमातून स्वातंत्र्य लढ्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिशा दिली. त्यामुळे वर्धा हे स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र राहिले.
Published by :
Team Lokshahi
Published on

भूपेश बारंगे | वर्धा वर्ध्यातील सेवाग्राम येथील आश्रमातून स्वातंत्र्य लढ्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिशा दिली. त्यामुळे वर्धा हे स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र राहिले. इतकेच नव्हे तर त्यांच्याच स्वदेशी आणि स्वयंरोजगार या विचारांची जोपासणा व्हावी या हेतूने मगन संग्रहालय समितीची वर्धा येथे 1938 मध्ये स्थापना करण्यात आली. गांधी विचारांचे जतन करणा-या याच संस्थेच्या मगन खादी विभागाने सन 2023-24 मध्ये तब्बल 45 हजार 605 मिटर खादीची निर्मिती केली आहे. या खादीची किंमत 1.20 कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.

मगन खादी विभागाच्या माध्यमातून हातमागावर खादीची निर्मिती केली जात आहे. या कामासाठी सुमारे 1 हजार 500 कामगारांचे सहकार्य घेतले जाते. यात 300 अकुशल तर 1 हजार 200 कुशल कामगारांचा समावेश आहे. स्वदेशीबाबत नागरिकांमध्ये आत्मियता वाढावी यासाठीही मगन खादी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. सध्या या समितीची जबाबदारी अध्यक्ष म्हणून डॉ. विभा गुप्ता सांभाळत आहेत. मगन खादी विभागाच्या माध्यमातून नैसर्गिक कापसाचे बियाणे शेतक-यांना दिले जातात. तर नैसर्गिक कापूस उत्पादकांकडून त्यांचा माल जादा दरात खरेदीही केला जातो. खरेदी केलेल्या नैसर्गिक कापसाची जिनिंग प्रेसिंग समुद्रपूर तालुक्याच्या गिरड येथील रोविंग युनिट येथे केली जाते. तर नंतर वर्धा आणि सेलू येथील युनिटमध्ये कापसापासून धागा तयार केला जातो. तयार झालेल्या धाग्यापासून वर्धा येथील युनिटमध्ये हातमागावर कापड तयार करण्यात येतो. याच ठिकाणी खादीच्या कपडावर आकर्षक रंगाई, छपाईही केली जात असल्याचे सांगण्यात आले.

डिझाईनसाठी 300 हून अधिक उडण ब्लॉकचा वापर

खादीच्या कपड्यावर एकापेक्षा एक आकर्षक डिझाईन रेखाटण्यासाठी मगन खादी विभागाच्या वर्धा येथील युनिटमध्ये कुशल कामगारांकडून 300 हून अधिक उडण ब्लॉकचा वापर केला जातो. इतकेच नव्हे तर पानाची डिझाईन खादीच्या कापडावर काढण्यासाठी बेल व इतर वनस्पतींच्या पानांचा वापर होतो.

रंगाईसाठी नैसर्गिक कलरचा वापर

खादीच्या कपड्यांवर आकर्षक डिझाईन तसेच खादीच्या कपड्याला रंगाई करण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर मगन खादी विभाग वर्धा युनिटमध्ये होतो. नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी खरडा, बिहाडा, कथ्था, झेंडूचे फुल, कळस फुल, धावरी फुल, रतन ज्योतीची साल, इंडिगो, सपन आदीचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले.

300 हून अधिक शेतक-यांनाही होतोय फायदा

मगन संग्रहालय समितीच्या माध्यमातून नैसर्गिक कापूस उत्पादक 300 हून अधिक शेतक-यांना नैसर्गिक कापसाचे बियाणे दिले जाते. शिवाय त्यांनी उत्पादिक केलेल्या नैसर्गिक कापसाची खरेदीही जादा भाव देत मगन संग्रहालय समिती करते. त्यामुळे याचा फायदा शेतक-यांनाही होत आहेच.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com