बैल पोळ्या दिवशीचं 'सर्जा-राजा'चा होरपळून मृत्यू
वर्धा (भूपेश बारंगे) : बैल पोळ्याच्या दिवशी गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला. तर गोठ्यातील विविध साहित्याची राखरांगाेळी झाल्याने शेतकऱ्यांचे तब्बल तीन लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे घडली. (Wardha Death of bulls in Pola)
धनोडी (बहाद्दरपूर) येथील शेतकरी सतीश रामकृष्ण सोनवणे यांनी गावाशेजारील गोठा उभारला आहे. या गोठ्यात जनावरांसह जनावरांचे वैरण आणि शेतीउपयोगी विविध साहित्य ठेवले जायचे. गुरूवारी पोळा सणाचे औचित्य साधून रात्रीला गाेठ्यात बांधून असलेल्या बैलांचे खांद शेकल्यावर शेतकरी घरी परतला.
पण नंतर अचानक लागलेल्या आगीत गोठ्यातील विविध साहित्य जळून कोळसा झाले. शिवाय गोठ्यातीलच दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.