Presidential election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य मुंबईत दाखल
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential election ) भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली (new delhi) यांनी आज मतपेट्या, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप केले आहे. हे सर्व साहित्य नवी दिल्ली येथून विमानाने मुंबई विमानतळावर आज प्राप्त झाले. या सर्व साहित्यांची वाहतूक करताना विशेष म्हणजे बॅलेट बॉक्स ही व्यक्ती आहे असे समजून तिकीट काढण्यात आले. हे सर्व साहित्य मंत्रालयातील सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी श्रीमती शुभा बोरकर तसेच विधानभवनातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर आणि अवर सचिव सुभाष नलावडे यांनी नवी दिल्लीहून मुंबईत आणले आहे.
येत्या 18 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती पदाकरीता (Presidential election ) भारताची राजधानी दिल्ली, पुंडूचेरी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य विधानमंडळ सचिवालये येथे मतदान होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने पाठविलेले निवडणूक साहित्य मुंबई विमानतळ येथून महाराष्ट्र विधानभवन येथे आणण्यात आले. हे साहित्य महाराष्ट्र विधान भवन (Maharashtra Vidhan Bhavan) येथे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळ सचिवालयाच्या स्ट्राँग रूम येथे पूर्ण सुरक्षित आणि योग्य त्या खबरदारीसह ठेवण्यात आले आहे.