आज होणार काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान, मतदारांसाठी काँग्रेसने दिल्या सूचना
काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची अनेक दिवसांपासुन चर्चा सुरु होती. अखेर आज मतदानाचा दिवस आला. सोमवारी होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाची तयारी काँग्रेसकडून पूर्ण झाली आहे. देशभरातील 40 केंद्रांवर 68 बूथ स्थापन करण्यात आले आहेत. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
या निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर हे दोन उमेदवार असणार आहे. या उमेदवाऱ्यांना सुमारे 9800 राज्य प्रतिनिधी मतदान करणार आहेत. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी यांच्यासह सीडब्ल्यूसीचे सदस्य काँग्रेस मुख्यालयातील बूथवर मतदान करतील. राज्यातील 561 प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले आहेत.
या निवडणुकीसाठी काँग्रेसने मतदारांना आता एक परिपत्रक काढत नियमावली सांगितली आहे. उमेदवारांना मत कसे करायचे या संबंधी माहिती काँग्रेसने अधिकृत ट्विटर अकाऊंट शेअर केली आहे.