सुरज दाहाट |अमरावती: अमरावती शहरासह विदर्भातील जनतेचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळात विदर्भाच्या राजाची (बाप्पाची) वाजत-गाजत विसर्जन शोभायात्रा आयोजित करण्यात येते. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदा दुपारी ३ वाजता ‘विदर्भाच्या राजा’चे उत्साहात विसर्जन होणार आहे.
यावेळी विदर्भाच्या ५ जिल्ह्यातील युवकांसह भाविकांची उपस्थिती राहणार आहे. यासोबतच ७ ढोल पथक आणि वारकरी दिंडी, ५ विविध प्रकारचे चित्ररथ या यात्रेत समावेश असेल. खापर्डे बगीचा मंडपातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. विसर्जन मिरवणूक खापर्डे बगीचा येथून इर्विन चौक, मर्च्युरी पॉइंट, रेल्वे स्टेशन चौक, रेल्वे स्टेशन ब्रिज, राजकमल चौक, श्याम चौक, सिटी कोतवाली, जयस्तंभ चौक, वसंत टॉकीज, दीपक चौक मार्गे मोसीकॉल जिनिंग येथील राम लक्ष्मण संकुल येथे ‘विदर्भाच्या राजा’ची आरती करून नियमानुसार बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे.
यानिमित्त दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीत सजावट, रांगोळ्या, केळीच्या पानांनी सजविलेल्या खांब, दिव्यांची सजावट करण्यात येणार आहे. व्यापारी वर्गाकडून विविध ठिकाणी गुलाल आणि फुलांची उधळण करून बाप्पाचे स्वागत करण्यात येणार आहे.
न्यू आझाद मंडळाच्या विदर्भाचा राजा गणपती उत्सवात अमरावती शहरातील सर्व राजकारणी एकत्र येऊन हा गणपती विसर्जन उत्सव सोहळा मध्ये उपस्थित राहतात, आज निघणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीवर पावसाचा सावट असलं तरी या ठिकाणी गणेश भक्तांचा उत्साह मात्र शिंगेला पोहोचला आहे, रात्री उशिरा विदर्भाच्या राजाच विसर्जन होणार आहे.