Vijay Wadettiwar Latest News
Vijay Wadettiwar Lokshahi

विशालगडावरील हिंसाचाराच्या प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात; म्हणाले, "कायदा सुव्यवस्थेचे धिंदोडे..."

विशालगडाच्या हिंसाचाराच्या प्रकरणावर राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
Published by :
Naresh Shende
Published on

Vijay Wadettiwar Press Conference: विशालगडावर असलेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावरून १४ जुलैला आंदोलकांमुळं मोठा हिंसाचार उसळला होता. त्यानंतर पोलिसांनी शिवप्रेमींसह संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. विशालगडाच्या हिंसाचाराच्या प्रकरणावर राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

शिवप्रेमींनी ही घटना घडवून आणल्याचा उल्लेख केला जात आहे. शिवप्रेमी ही घटना करुच शकत नाही. हा अतिरेक ते करुच शकत नाही. हा अतिरेक्याचा प्रकार आहे. गडावरच्या अतिक्रमणाचा विषय असताना गजापूर गावात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक चर्चा करत होते. त्यांना याबाबत माहिती होती. पोलिसांच्या हातात दंडुके होते आणि त्यांच्या डोळ्यादेखत त्या लोकांनी हिंसक कृत्य केलं. ते तेव्हढ्यावरच थांबले नाहीत. एखाद्या धार्मिक स्थळाचा विध्वंस कसा करायचा, गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांना मारलं आहे. लोकांना जखमा झाल्या आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंदोडे निघताना आपण पाहिले आहे.

राज्याचे गृहमंत्री म्हणतात, हिरवा झेंडा घेऊन नाचणारे आहेत. पण याला असं स्वरुप देण्याची गरज नाही. कारण त्या गजापूर गावात जे नुकसान झालं, तिथे इतरही धर्माची लोकं होती. विशाल गडावर जे अतिक्रमण होतं, ते सर्वांच होतं. ते एका धर्माचं नव्हतं. पण त्याला रंग देण्याचा प्रकार राज्यात सुरु आहे, तो अतिशय निंदनीय आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत आहोत.

शाहु-फुले यांच्या पुरोगामी विचाऱ्यांच्या कर्मभूमीत या जातीयवादी शक्तींना एव्हढा राग का यावा? मागील काही दिवसात दोन-तीन जिल्ह्यात एक लांब मिशीवाला भिडे नावाचा माणूस जे वक्तव्य करत आहे, त्यामुळे धर्मात भांडणं होत आहेत. विशालगडावर झालेल्या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे, याची चौकशी झाली पाहिजे. हा सरकारमध्ये आहे का? ज्यांच्या इशाऱ्यावर हे होत आहे, याचंही उत्तर मिळालं पाहिजे. कारण निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारच्या घटना घडण्याची सुरुवात आता होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com