'सरकारमध्ये नागपूरकरांचीच चलती, बाकी दोन बाहुले' वडेट्टीवारांचा टोला
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज नागपूरात बोलत होते. यावेळी हिवाळी अधिवेशनाबाबत बोलताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप दुतोंडी साप आहे. कोणत्या दिशेने जाईल असं सांगता येत नाही. असं ते म्हणाले आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजप दुतोंडी साप आहे. कोणत्या दिशेने जाईल असं सांगता येत नाही. सत्तेत असताना भूमिका वेगळी असते, विरोधात असताना भूमिका वेगळी असते. नागपूर कराराप्रमाणे सहा आठवडे अधिवेशन चालले पाहिजे. नाही तर किमान तीन आठवडे अधिवेशन चालले पाहिजे. तसेही या सरकारमध्ये नागपूरकरांचीच चलती आहे, बाकी दोन बाहुले आहे. त्यामुळे नागपूरकरांनी (फडणवीस) हे अधिवेशन सहा आठवडे नाही तर किमान तीन आठवडे चालवावे अशी आमची अपेक्षा आहे. असं ते म्हणाले आहेत.
कंत्राटी भरतीबाबत बोलताना ते म्हणाले, भाजप सरकारमध्ये येऊन दीड वर्ष झाले आहे. जर आमच्या काळात कंत्राटी भरतीचा कायदा झाला असेल, तर हे दीड वर्ष झोपले होते का? ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पुन्हा जीआर कोणी काढले? कॅबिनेटमध्ये सुधारित प्रस्ताव कोणी आणला? हे सर्व भाजप ने सांगावे. असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच याप्रकरणी भाजपने नाक घासून राज्याच्या तरुणांची माफी मागावी अस देखील ते म्हणाले आहेत.
केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केले मात्र त्यासाठी लावलेले निकष शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे आहे. केंद्र सरकार ने दीडपट उत्पन्नाचा गाजर दिला होता. मात्र आता शेतकऱ्यांना खायला सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती आहे. उत्पादन खर्च आणि केंद्र सरकार ने जाहीर केलेले हमीभाव म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे.