Video : दिल्लीत विद्यार्थिनीवर अॅसिड अटॅक; घटना सीसीटीव्हीत कैद
नवी दिल्ली : दिल्लीतून आज भयंकर घटना समोर येत आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या द्वारका भागात भरदिवसा एका 17 वर्षीय मुलीवर अॅसिड अटॅक करण्यात आला आहे. यामध्ये पीडिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, माझ्या दोन मुली (एक 17 वर्षांची आणि दुसरी 13 वर्षांची) आज सकाळी एकत्र बाहेर पडल्या होत्या. अचानक दोन दुचाकीस्वारांनी माझ्या मोठ्या मुलीवर अॅसिड फेकले आणि तेथून निघून गेले. त्यांनी चेहरा झाकून घेतला. मुलीची प्रकृती गंभीर आहे आणि अॅसिड मुलीच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यातही गेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुलीने दोन संशयितांना ओळखले असून त्यापैकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेची दखल दिल्ली महिला आयोगाने घेतली असून याबाबत चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी म्हंटले की, देशाच्या राजधानीत एका शाळकरी मुलीवर दोन गुंडांनी भरदिवसा अॅसिड फेकले. अजूनही कोणाला कायद्याची भीती वाटते का? अॅसिडच्या विक्रीवर बंदी का घालू शकत नाही? लज्जास्पद आहे. अॅसिड भाज्यांसारखे सहज उपलब्ध आहे सरकार त्याच्या किरकोळ विक्रीवर बंदी का घालत नाही? सरकार कधी जागे होणार, असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.