भाज्यांची किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाईचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर

भाज्यांची किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाईचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर

भाज्यांच्या किंमतीत ६३.०४ टक्क्यांची वाढ; घाऊक महागाई दर चार महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला.
Published by :
shweta walge
Published on

भाज्या आणि उत्पादित खाद्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देशातील घाऊक महागाई दर सरलेल्याऑक्टोबर महिन्यात २.३६ टक्क्यांवर पोहोचला, असे गुरुवारी वाणिज्य आणि उद्याोग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. खाद्यान्न महागाईचा १३.५४ टक्क्यांवर, त्यातही भाज्यांतील किंमतवाढीचा ६३.०४ टक्क्यांवर भडका हा आकडेवारीतील सर्वात चिंतादायी घटक आहे.

घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर सलग दुसऱ्या महिन्यात वाढला असून तो आता गत चार महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याचे ताजी आकडेवारी दर्शविते. जून २०२४ मध्ये त्याने ३.४३ टक्के असा चालू वर्षातील सर्वोच्च स्तर गाठला होता. आधीच्या महिन्यांत म्हणजेच सप्टेंबर २०२४ मध्ये हा दर १.८४ टक्के, तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तो उणे (-) ०.२६ टक्के पातळीवर होता.ऑक्टोबरमध्ये खाद्यान्न घटकांमधील महागाई १३.५४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे, जी सप्टेंबरमध्ये ११.५३ टक्के पातळीवर होती.

सप्टेंबरमधील ४८.७३ टक्क्यांच्या तुलनेत भाज्यांच्या महागाईचा दर ६३.०४ टक्क्यांवर गेला आहे. ऑक्टोबरमध्ये बटाटे आणि कांद्याची महागाई अनुक्रमे ७८.७३ टक्के आणि ३९.२५ टक्क्यांवर राहिली. दुसरीकडे इंधन आणि ऊर्जा श्रेणीतील घटकांमध्ये ऑक्टोबरमध्ये ५.७९ टक्क्यांची घसरण झाली, सप्टेंबरमध्येही त्यात ४.०५ टक्क्यांची घसरण झाली होती. उत्पादित वस्तूंच्या महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये १.५० टक्के होता, जो मागील महिन्यात १ टक्क्यांवर मर्यादित होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com