कोर्टाने शिक्षा सुनावली अन् फाईल घेऊन उत्तर प्रदेशच्या मंत्र्याने कोर्टातूनच धूम ठोकली

कोर्टाने शिक्षा सुनावली अन् फाईल घेऊन उत्तर प्रदेशच्या मंत्र्याने कोर्टातूनच धूम ठोकली

1991 मध्ये तत्कालीन समाजवादी पक्षाचे नेते राकेश सचान यांच्याकडून पोलिसांनी अवैध शस्त्र जप्त केले होते.
Published by :
Sudhir Kakde
Published on

उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राकेश सचान यांच्यावर एका प्रकरणाची फाईल घेऊन कोर्टातून पळून गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शनिवारी कानपूर न्यायालयाने सचाना यांना एका प्रकरणात दोषी ठरवलं होतं. मात्र न्यायालय शिक्षा सुनावण्यापूर्वीच मंत्री आपल्या वकिलाच्या मदतीनं दोषी ठरवण्याच्या आदेशाची मूळ प्रत घेऊन पळून गेले. एवढंच नाही तर जामीनपत्र न भरताच तो कोर्टरूममधून पळून गेला. आता मंत्र्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार देण्यात आली आहे.

1991 मध्ये तत्कालीन समाजवादी पक्षाचे नेते राकेश सचान यांच्याकडून पोलिसांनी अवैध शस्त्र जप्त केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात शनिवारी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी-३, कानपूर यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. यादरम्यान कोर्टाने सचाना यांना दोषी ठरवलं. राकेश सचाना यांना दोषी सिद्ध करून शिक्षा सुनावण्याची तयारी कोर्ट करत होतं. यापूर्वी बचाव पक्षाला शिक्षेवर वाद सुरू करण्यास सांगितलं होतं. मात्र राकेश सचान दोषी ठरवण्याच्या आदेशाची फाईल घेऊनच कोर्टातून गायब झाले आणि या प्रकरणाला कलाटणी मिळाली. यानंतर संपूर्ण न्यायालयात आणि पोलीस-प्रशासनात खळबळ उडाली.

दुसरीकडे, राकेश सचान यांना आजारपणामुळे घेऊन जाण्यात आल्याचं वकिलांच्या वतीने दुपारी सांगण्यात आलं. तर मंत्र्यांनीच या खटल्यात तारीख मिळणार असल्यानं आपण तिथून निघून गेलो असल्याचा दावा केल्यानं गोंधळ निर्माण झाला आहे. राकेश सचान यांनी कोर्टरूममधून पळ काढल्याचा आरोप फेटाळून लावला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com