"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल
Yogi Adityanath On Congress : देशात मुघलांचं साम्राज्य संपवून या पावनभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. औरंगजेबाच्या मुसक्या आवळून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा झेंडा बुलंद केला. अयोध्येत राम मंदिराचं निर्माण म्हणजे भारतातील १४० कोटी लोकांच्या भावनेचं प्रतिक आहे. जनतेनं नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री केल्यानंतर त्यांनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिराचा मार्ग प्रशस्त केला. मला जेव्हा संधी मिळते, मी अयोध्येत जातो. ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली आणि रामलल्ला अयोध्येत पुन्हा एकदा विराजमान झाले. ही देशासाठी सर्वात मोठी गौरवाची गोष्ट आहे, असं मोठं विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. ते पालघरमध्ये महायुतीच्या सभेत बोलत होते.
योगी आदित्यनाथ विरोधकांवर टीका करत म्हणाले, काँग्रेसचे लोक म्हणायचे, अयोध्येत हिंदूंच्या बाजूने निर्णय झाला तर दंगल होईल. रक्ताच्या नद्या वाहतील, भारतात हल्ला होईल. पण या लोकांना महितच नाही की, हा नवीन भारत आहे. हा भारत बोलत नाही, तर करून दाखवतो. रामलल्ला आयेंगे, मंदिर वही बनायेंगे, असा आमचा संकल्प होता. अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो कारसेवक आले होते. चार टप्प्यातील मतदान संपलं आहे. आता पाचव्या टप्प्यासाठी मतदान करायचं आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार, हाच नारा देशात सुरु आहे. एनडीएनं असा नारा लगावल्यावर विरोधकांना असं वाटतं की, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
भाजप भारताला आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवण्याचा संकल्पासोबत या निवडणुकीत उतरली आहे. निवडणूक आमच्यासाठी सत्ता उपभोगण्याचं साधन नाही. गरिबाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी, वंचितला त्यांचा अधिकार देण्याचा, तरुणांना रोजगार देण्यासाठी, शेतकऱ्याला त्यांचं हक्क देण्यासाठी ही निवडणूक आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीसाठी निवडणूक देशाला लुटण्याचं माध्यम आहे. आमच्यासाठी ही निवडणूक म्हणजे, जनतेच्या आनंदासाठी आणि भारताला जगातील सर्वात मोठी ताकद बनवण्याचा एक संकप्ल आहे. हा संकल्प सोबत घेऊन आम्ही पुढे जात आहोत. हा संकल्प नसता तर भारताने गेल्या दहा वर्षात एव्हढी प्रगती केली असती का? मोदींच्या नेतृत्वात भारताने केलेली प्रगती अभूतपूर्व आहे, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.