गोविंदांना विमा संरक्षणासाठी अर्ज भरण्याचे आवाहन; 'या' तारखेपर्यंत अर्ज भरता येणार
दहीहंडी असोसिएशनने (महाराष्ट्र राज्य) आक्षेप घेतलेला असतानाही महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व गोविंदांचा विमा उतरविण्याची मोहीम सुरू केली आहे. या संस्थेने गोविंदांना विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. विमा संरक्षणाचा कालावधी हा 14 ऑगस्टपासून ते 28 ऑगस्ट रोजी सकाळी 6:00 वाजेपर्यंत आहे.
सध्या सर्वत्र दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने मानवी मनोरे रचण्याचा सराव सुरू आहे. मात्र थर रचताना गोविंदाचा मृत्यू झाल्यास अथवा गंभीर जखमी झाल्यास संबंधित गोविंदाच्या कुटुंबियांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे 2023 प्रमाणे 2024 मध्येही दहीहंडी दरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील 75 हजार गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
याबाबतचा ‘शासन निर्णय’ही राज्याच्या क्रीडा विभागातर्फे 25 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच गोविंदांपर्यंत विमा संरक्षण पोहोचवण्याची जबाबदारी ‘महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन या संस्थेकडे सोपविली आहे. मोफत विमा संरक्षण मिळविण्यासाठी गोविंदा पथकांनी 24 ऑगस्टपर्यंत मंडळाचे विनंती पत्र, अर्ज व सर्व गोविंदांची नावे, वय व मोबाईल क्रमांक नमूद करून स्कॅन करून gi.mrdga@gmail.com या ई –मेल आयडीवर पाठवायचे आहेत. विमा संरक्षणाच्या यादीत 14 वर्षांखालील गोविंदांचा समावेश नसेल, असे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने सांगितले.