"कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे", सोलापूरात योगी आदित्यनाथ कडाडले
बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पूजा करून, महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याला, सावित्रिबाई फुले यांच्या महिला सशक्तीकरण अभियानाला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाच्या विचारांना पुढे नेण्याचं काम मोदींनी दहा वर्षात केलं आहे. त्यामुळे १४० कोटी भारतीय नागरिकांचा जगात सन्मान वाढला आहे. भारताच्या सीमा सुरक्षित झाल्या आहेत. कोणताही देश भारताच्या सीमेवर हल्ला करु शकत नाही. दहशतवाद, नक्षलवाद संपवून टाकलं आहे. छोटा फटाका जरी फुटला, तरी पाकिस्तान स्पष्टीकरण देत सांगतो, यामध्ये आमचा हात नाहीय. कारण त्यांना माहित आहे. हा नवीन भारत आहे. कुणाची छेडछाड करत नाही. पण कुणी भारताशी पंगा घेतला, तर त्याला सोडतही नाही. हा काँग्रेसच्या काळातील भारत नाही. कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे, असं म्हणत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे. ते सोलापूरमध्ये महायुतीच्या सभेत बोलत होते.
योगी आदित्यनाथ जनतेला संबोधीत करताना म्हणाले, गेल्या दहा वर्षात मोदींनी जे विकासाचं काम केलंय, ते विकसीत भारताचा आधार बनला आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. जेव्हा माझा देश आत्मनिर्भर होईल, विकसीत होईल, तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद येईल. प्रत्येक तरुणाला रोजगार मिळालेला असेल. प्रत्येक शेतकरी आत्मनिर्भर होईल. महिला वर्ग स्वावलंबी होईल. प्रत्येक व्यापाऱ्याचं उद्योग वाढेल, हीच मोदींची इच्छा आहे. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता. काँग्रेस ६५ वर्षात गरिबी हटवू शकले नाही. मोदींनी फक्त १० वर्षात २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेखेच्या बाहेर काढलं.
संपूर्ण देशात ८० कोटी लोकांना मोफत रेशन मिळत आहे. ६० कोटी लोकांना पाच लाख रुपयांची आयुष्यमान भारताची योजना मिळाली आहे. ५० कोटी लोकांचे जनधन खाते उघडले आहेत. पण काँग्रेस जनतेच्या पैशांची लूट करत होती. पण मोदींनी जनधन खातं उघडून पैसा थेट जनतेला दिला. १२ कोटी लोकांना किसान सन्मान निधी दिला. १० कोटी घरांना उज्ज्वला योजनेचा गॅस सिलिंडर मोफत पोहोचला. ४ कोटी गरिबांना प्रधानमंत्री आवाज योजनेचा लाभ मिळाला. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रेल्वे, रस्ते, मेट्रो, रॅपिड रेल, आयआयटी, आयआयएम यांसारख्या अनेक गोष्टींचा विकास झाला.
अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर काँग्रेसने उभारलं असतं का, राम मंदिर उभारण्याचा निर्णय होत असताना काँग्रेसने म्हटलं होतं, रक्ताच्या नद्या वाहतील. आम्ही प्रत्युत्त दिलं, रक्ताची नदी नाही, एक मच्छरही मरणार नाही. उत्तर प्रदेशात मागील सात वर्षात एक दंगलही झाली नाही. कोणत्याही प्रकारचा कर्फ्यू लागला नाही. उत्तर प्रदेशातील गुंडगिरीही संपवली. याच काँग्रेसने हिंदूंचा अपमान करून हिंदू आतंकवाद असं म्हटलं होतं. काँग्रेसने देशात दहशतवाद आणि नक्षलवाद वाढवला.