Ramdas Athawale
Ramdas Athawale

"रिपाईला एकही जागा दिली नाही, तरीसुद्धा नाराजी..."; लोकसभेचा एक्झिट पोल पाहिल्यावर रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

"एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त केले असले, तरी आमच्या अंदाजानुसार देशात ४०० पेक्षा जास्त जागा आणि महाराष्ट्रात ३५ ते ४० जागा निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे"
Published by :
Naresh Shende
Published on

Ramdas Athawale On Loksabha Exit Poll : एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त केले असले, तरी आमच्या अंदाजानुसार देशात ४०० पेक्षा जास्त जागा आणि महाराष्ट्रात ३५ ते ४० जागा निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. रिपाईला एक जरी जागा दिली नसली, तरीसुद्धा नाराजी बाजूला ठेऊन आमच्या कार्यकर्त्यांना मी कामाला लावलं. मोठ्या प्रमाणात आरपीआयचे कार्यकर्ते महायुतीसोबत काम करु लागले. त्यामुळे यश आमच्या पदरात पडेल, असा आमचा विश्वास आहे. जनता आमच्या बाजूला आहे, असा आमचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रामदास आठवले म्हणाले, गेल्या दहा वर्षापासून जे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी ४०० पारचा नारा दिला होता. त्यांनी या प्रचारात जबरदस्त आघाडी मारली होती. दहा वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी लोकांसमोर मांडला होता. सर्वच पक्षांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. जनता ज्यांच्या बाजूला जाते, त्यांना सत्ता मिळते. गेल्या ७० वर्षात काँग्रेस पक्ष ६० वर्षे सत्तेत राहिला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत लोकमत होतं. पण गेल्या दहा वर्षापासून नरेंद्र मोदींनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. विकासाच्या मुद्द्यावर मोदींनी लोकांना आकृष्ट केलं आहे. त्यामुळे मोदींनी दिलेला चारशे पारचा नारा यशस्वी होईल, अशी आम्हाला आशा आहे.

४ जूनची वाट सर्वांनी पाहायची आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी म्हणते, आम्ही सत्तेवर येणार आहेत. पण आम्हाला सुद्धा सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन देशात चांगल्या प्रकारचं वातावरण मोदी निर्माण करत आहेत. २०४७ पर्यंत देशाला उंच शिखरावर पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. त्यांनी १२५ दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तो सत्ता आल्यावर पाहायला मिळेल. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वावर देशाच्या जनतेचा विश्वास आहे. हे ४ तारखेला सिद्ध होईल. आरपीआयने देशभरात एनडीए आणि भाजपला पाठिंबा दिला होता. लक्षद्विप सोडलं, तर सर्व राज्यात आणि केंद्रशासीत प्रदेशात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं आहे.

महाराष्ट्रात मुंबईत आरपीआयने प्रचारासाठी चांगला सहभाग घेतला होता. दलित मतदारांना एनडीएच्या बाजूला वळवण्यात आम्हाला यश आलं. आम्हाला विश्वास आहे, महाराष्ट्रात आमच्या ३५ ते ४० जागा निवडून येतील. महाराष्ट्राचा एक्झिट पोलचा निकाल आमच्यासाठी चांगला दिसत नाहीय. पण मागच्या वेळी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड आणि इतर दोन राज्याच्या निवडणुका होत्या. त्यावेळी मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये एनडीए आणि भाजपचं सरकार येणार नाही, असे रिपोर्ट होते. मध्यप्रदेशात १६३ जागा भाजपने जिंकल्या. एनडीएला याठिकाणी प्रचंड मोठं यश मिळालं, असंही रामदास आठवले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com