कार्यालय स्वच्छ करणाऱ्या अधिकाऱ्यांना पारितोषिक देण्याऐजवी, शहर स्वच्छ करणाऱ्या अधिकाऱ्याला पारितोषिक द्या
अमजद खान। कल्याण: स्वच्छता अभियानांतर्गत माझे कार्यालय, स्वच्छ कार्यालय ही मोहीम केडीएमसी मार्फत राबविली जाणार आहे. या मोहीमे अंतर्गत अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्थरावर खर्च करुन कार्यालय स्वच्छ करायचे आहे. जे अधिकारी चांगले काम करतील त्यांना केडीएमसी वर्धापन दिनानिमित्त बक्षीस देऊन गौरविले जाणार असल्याची अशी घोषणा केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केली आहे.
आयुक्तांनीहीच स्पर्धा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकरीता आणि शहर स्वच्छतेकरीता आयुक्तांनी आयोजित केली असती, तर केडीएमसीच्या वर्धापदिनी नागरीकांसाठी एक वेगळी भेट ठरली असती. असे केडीएमसीच्या नागरिकांचे मत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका नेहमी वादाच्या भोवऱ्यात असते. महापालिका क्षेत्रत रस्त्यावरील खड्यांचे साम्राज्य आहे. सर्वत्र अस्वच्छता आहे. गणेशोत्सव आला आणि गेला. मात्र, खड्डे जैसे थे आहेत. केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी गाजावाजा करीत गणेशोत्सववा आधी खड्डे भरले पाहिजे. नाही तर निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांना काळ्य़ा यादीत टाकण्याची घोषणा केली होती.
मात्र, अशी कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र आयुक्तांनी माझे कार्यालय, स्वच्छ कार्यालय यासाठी पुढाकार घेत अधिकारी स्थरावर खर्च करुन कार्यालय स्वच्छ करण्यासाठी स्पर्धा घेतली आहे. तसेच त्यांना बक्षीसे देण्याचेही जाहिर करण्यात येणार आहे. शहरात खड्डय़ांचे साम्राज्य आहे. स्वच्छतेसाठी नागरीक तक्रार करुन थकले आहे. कचरा उचलला जात नसल्याने एका नागरीकांने कचऱ्यात बसून महापालिकेच्या विरोधात आंदोलनही केले होते. परंतू काही परिणाम झाला नाही. आयुक्त दांगडे यांनी रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी आणि खड्डे भरण्यासाठी अधिकारी वर्गात स्पर्धा ठेवली असती तर नागरीकांना वर्धापन दिनाची चांगली भेट ठरली असती. असे नागरिक म्हणत आहे.