UK Crisis : लिज ट्रस यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, इंग्लंडमध्ये मोठा राजकीय भूकंप
कालच ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेवरमॅन यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ब्रिटनच्या पंतप्रधान लिज ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. लिज ट्रस या फक्त 44 दिवस पंतप्रधान राहिल्या. सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याचा राजीनामा आणि संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील सदस्यांकडून तीव्र टीका झाल्यानंतर ट्रस यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
गेल्या महिन्यात, सरकारने एक आर्थिक योजना सादर केली, ज्याच्या अपयशामुळे आर्थिक गोंधळ आणि राजकीय संकट निर्माण झाले होते. त्यानंतर ट्रस यांच्यावर टीका करण्यात येत होती. यानंतर आता ट्रस यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
लिज ट्रस यांची प्रतिक्रिया
राजीनामा दिल्यानंतर लिज ट्रस यांनी प्रतिक्रिया, सध्याची परिस्थिती बघता मी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, ज्यासाठी मी लढले होते. मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे, याची माहिती मी दिली आहे. मी पंतप्रधान झाले तेव्हा देशात आर्थिक स्थिरता नव्हती, असं लिज ट्रस म्हणाल्या.
आम्ही कर कमी करण्याचं स्वप्न बघितलं. मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालण्याचा प्रयत्न केला, पण याची अंमलबजावणी करता आली नाही, त्यामुळे मी राजीनामा देत आहे. पुढच्या पंतप्रधानाची घोषणा होत नाही, तोपर्यंत मी काळजीवाहू पंतप्रधान राहीन, असं लिज ट्रस यांनी स्पष्ट केलं.
अर्थमंत्री बदलण्याव्यतिरिक्त, ट्रस यांना त्यांच्या अनेक धोरणांमध्ये बदल करावा लागला होता. ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, असे अनेक कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते सांगत होते. प्रदीर्घ दबावानंतर ट्रस पायउतार झाल्या आहेत.