उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण पुन्हा मिळू शकतो का? उज्ज्वल निकम म्हणाले...
निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर शिंदे-ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 17 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाचे दावे फेटाळून लावले होते. यावेळी 23 जानेवारीला दोन्ही गटांना लेखी स्वरुपात उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला होते. यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे.
याच पार्श्वभूमीवर एका माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेल्यास उद्धव ठाकरे यांना शिवसेनेवर त्यांचाच अधिकार कसा आहे ते सिद्ध करावे लागेल. अन्यथा निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय अंतिम आहे. असे निकम म्हणाले.
तसेच एकदा निवडणूक आयोगाने निकाल दिल्यावर तो निकाल अंतिम असतो, मात्र अपवादात्मक प्रकरणात सुप्रीम कोर्टात हा विषय स्टँड होऊ शकतो, त्यांना दाद मागता येते. निवडणूक आयोगाचा निकाल हा एकनाथ शिंदे यांना मानसिक आनंद देणारा आहे. तो किती वेळ टिकेल हे सांगू शकत नाही. असे निकम म्हणाले.