'केंद्रात जे बसतात त्यांच्या घरी काम करणारा माणूस राज्यपाल म्हणून पाठवलायं'
महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानांविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चा पार पडला आहे. यादरम्यान आपण सगळे महाराष्ट्र प्रेमी महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालून जाऊ. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी डिवचलं, त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी महामोर्चास संबोधित करताना केलं आहे. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अजित पवार, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड महत्वाचे नेते उपस्थित होते.
शिवसेनेतील बंडखोरांवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज सगळे पक्ष एकवटले आहेत. फक्त महाराष्ट्र द्रोही या मोर्चात नाही आहेत. स्वतःला बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे तोतये.. खुर्चीसाठी लाचारी करणारे हे आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता झुकवणार नाही आणि जो तसा प्रयत्न करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही, ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे.
राज्यपालांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी त्यांना राज्यपाल मानतच नाही. त्या पदावर कुणीही बसावं आणि कुणालाही टपल्या माराव्यात, हे सहन करणार नाही. केंद्रात जे बसतात, त्यांच्या घरी काम करणारा माणूस राज्यपाल म्हणून पाठवून दिलं. सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात.. हे आता महाराष्ट्र सहन करणार नाही
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ज्या लोकांनी तेव्हा शेणमार, धोंडमार सहन करून कार्य केलं, त्यांनी ते केलं नसतं तर आज आपणही यांच्यासारखे मंत्री बनून शाब्दिक भीक मागत बसलो असतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.