Uddhav Thackeray: त्यांना गाडून त्यांच्या उरावर भगवा फडकवून दाखवेन
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपावर सडकून टीका केली आहे.
"मला दिल्लीकरांची पर्वा नाही. किती पिढ्या यायच्या तितक्या येऊ द्या, मी इथे त्यांना गाडून त्यांच्या उरावर भगवा फडकवून दाखवेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ही लढाई साधी नाही. एका बाजूला बलाढ्य अब्दाली सारखी माणसं आहेत, केंद्राची सत्ता आहे. शासकीय यंत्रणा आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला नेस्तानभूत करायचे हे त्यांनी ठरवलेले आहे. पण ही फक्त शिवसेना नाही तर ही वाघनखं आहेत जी मला बाळासाहेबांनी दिलेली आहेत. तुमचे ऋण या जन्मात फेडू शकत नाही. तुमचे पाठबळ नसते तर मी उभा राहू शकलो नसतो. सर्व ओरबाडून घेतल्यानंतर फक्त तुम्ही आणि तुम्हीच आई जयदंबेसारखं माझ्यासोबत उभे राहिलात. त्यामुळे मला दिल्लीकरांची पर्वा नाही. किती पिढ्या यायच्या तितक्या येऊ द्या, मी इथे त्यांना गाडून त्यांच्या उरावर भगवा फडकवून दाखवेन, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
आनंद दिघे असते तर त्यांनी शिंदेला गोळी घातलीच असती...
उद्धव ठाकरे यांनी शाब्दिक कोटी करत निशाणा साधला आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपी शिंदेचे एन्काऊंटरचा दाखला दिला. आरोपीचा एन्काऊंटर केला हे चांगलंच झालं. आज जर आनंद दिघे असते तर त्यांनीही हेच केलं असतं, शिंदेला गोळी घातली असती असे भाष्य केलं आहे.
शेवटचा श्वास असेपर्यंत, शाहू-फुले-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र मोदीशहांचा होऊ देणार नाही. भाषणाचा समारोप करताना उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या शिवसैनिकांकडून मशाल धगधगत ठेवण्याची शपथ घेतली.