"...तर नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री होण्याचा कोणताच अधिकार नाही"; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर डागली तोफ
Uddhav Thackeray On Narendra Modi : काश्मीरमध्ये पुन्हा पुन्हा हल्ले होत आहेत. मोदी सरकार याकडं दुर्लक्ष करत आहे. मोहन भागवत यांनी म्हटलं की, मणीपूर जळत आहे. एक वर्षानंतर अखेर त्यांनी म्हटलं. मोदी-शहांनी निवडणुकी दरम्यान प्रचार केला होता की, काश्मीरमध्ये आम्ही ३७० कलम हटवलं होतं. याबाबतची सत्यता मी सर्वांसमोर मांडली होती. आमचे वकील असीम सरोदे यांनीही याबाबत माहिती दिली होती. काश्मीरमध्ये लोकांचे जीव जात आहेत आणि हे सरकार स्थापन करण्यात व्यस्त आहेत. तीन दिवसात तीन हल्ले झाले आहेत, याला जबाबदार कोण आहे? अजूनही मोदी तिकडे जाणार नाहीत का? की विरोधी पक्षांना संपवण्यात त्यांना आनंद व्यक्त करायचा आहे, जर त्यांना या गोष्टी सांभाळता येत नसतील, तर त्यांना प्रधानमंत्री होण्याचा कोणताच अधिकार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याचे लोकार्पण केलं आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर प्रमोद नवलकर यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. सुशिक्षीत मतदारांचे प्रश्न थोडेसे वेगळे असतात. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांना भेडसावत असतातच. पण शिकल्यानंतर पुढे काय करायचं, पदवी मिळाल्यानंतर काय करायचं? हा एक प्रश्न निर्माण झालेला असतो. पुढचा टप्पाही पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठी अनिल परब यांनी काही वचनं दिली आहेत. मी मुंबईतल्या तमाम पदवीधर मतदारांना हात जोडून विनंती करत आहे.
गेले पाच टर्म तुम्ही शिवसेनेला मतांच्या रुपात अशीर्वाद दिलं आहे. शिवसेना आणि मुंबईकरांचं नातं काय आहे, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या नात्यालाच आम्ही अधिक दृढ करू आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत, त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही शिवसेनेला आजपर्यंत जसा आशीर्वाद दिला आहे, तसेच आशीर्वाद यावेळीही शिवसेनेला द्याल, अशी अपेक्षा आहे. हे मतदान येत्या २६ जूनला आहे. २६ जूनला सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे सुट्टी नाहीय.२६ जून हा कामाचा दिवस आहे. मी सर्व मतदारांना, माता भगिनींना विनंती करतो, आपण शिवसेनेला मतदान करून आपण आपल्या कामाला जावं, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.