ठाकरे गटाकडून लोकसभेचे ४ उमेदवार जाहीर, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले,"...तर देश संपणार"
लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने चार उमेदवार घोषित केले आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघातून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजीत पाटील, जळगावमधून करण पवार, तर पालघरमध्ये भारती कामडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी या उमेदवारांची नावे घोषित करतानाच मोदी सरकारवर हल्लाबोलही केला. धक्का खाणारी शिवसेना नाही, तर शिवसेना जोरात धक्का देते. यावेळी देशात पुन्हा एका पक्षाचं सरकार आलं, तर देश संपला म्हणून समजा, असं म्हणत ठाकरेंनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. तसंच यावेळी उन्मेश पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
ठाकरे पुढे म्हणाले, राजकारणात बदल गरजेचा आहे. देश हुकूमशाहीच्या दिशेनं चालला आहे. आमच्या पक्षात गद्दारी झाली. भाजप वेगळ्या दिशेनं जात असल्यानं उन्मेश पाटील पक्षप्रवेश करत आहेत. बंड कशाला म्हणतात, ते उन्मेश पाटलांनी दाखवून दिलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी राऊतांवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. भविष्यात मविआसोबत काही जमणार नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेऊ नये. मुंबईच्या दोन जागांवर मविआमध्ये विचार सुरु आहे. सांगलीचा प्रचारही सुरु झालेला आहे. काँग्रेसने जागावाटप केल्याप्रमाणे पुढील कामाला सुरुवात करावी.