"मोदीजी पोलीस बाजूला ठेऊन जनतेत येऊन दाखवा", उद्धव ठाकरेंचा PM नरेंद्र मोदींना इशारा
Uddhav Thackeray On Narendra Modi : मोदी एव्हढे घाबरलेत की आता त्यांना दिल्ली बघता येणार नाही. महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघू देणार नाही. मोदीजी २०१४ साली तुम्ही पंतप्रधान व्हावे, म्हणून माझी सही घेतली होती. काल तुम्ही जे बोललात, त्याबद्दल माझा महाराष्ट्र तुम्हाला क्षमा करु शकत नाही. तुम्ही माझ्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणालात. तुम्ही मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणाला. तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला की काय, बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल, मी बाळासाहेबांना शब्द दिला होता, मी शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करून दाखवेन. पण तो शब्द तुम्ही तोडला. मी आजारी असताना मोदींनी माझ्या पक्षात गद्दारीची बीजं रोवली. तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल, चांगल सुरु असलेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. तुम्हाला आज महाराष्ट्राने गुडघे टेकायला लावले आहेत, मोदीजी तुम्ही पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा ना, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. ते संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत बोलत होते.
मोदींवर टीका करताना ठाकरे पुढे म्हणाले,मोदीजी तुम्ही पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा ना, रस्त्यावरून चालतानाही एकटे चालतात. संपूर्ण कडेकोट बंदोबस्त असतो. तरीही ते बोलतात, हे मला संपवायला निघाले आहेत. संपूर्ण ताकद तुमच्याकडे आहे, पण तुमची एव्हढी केविलवाणी अवस्था का झालीय? तुम्ही माझा पक्ष, चिन्ह चोरलं. तुम्ही माझी माणसं फोडली. तरीही तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटते.
मग लोकांमधील उद्धव ठाकरे बरे आहेत. हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे. एकमेकांचा आदर करणारा आहे. आजपर्यंत तुम्ही सर्व फोडलं. शिवसेना-राष्ट्रवादी फोडली. आज सकाळी शरद पवारांना डोळा मारला आणि म्हणाले या आमच्याकडे. एकदा बोलतात नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. मग म्हणायचं, या आमच्या गाडीत बसा.
मोदी आता मुंबईत रोड शो करणार आहेत. म्हणजे ते रस्त्यावर आले आहेत. ४ जूननंतर पूर्ण रस्त्यावर येणार आहेत. महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावर फिरवल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण मराठवाडा पाण्याच्या नावाने आक्रोश करत आहे. तिथे मोदींना आणि शहांना लक्ष द्यायला वेळ मिळत नाहीत. मला नकली संतान म्हणता. पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणता. पण शेतकऱ्यांचे आत्मे तळमळत आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. तुम्ही गाईवर बोलता मग महागाईवर का नाही बोलत. तुमच्या हिंदुत्वात आणि आमच्या हिंदुत्वात जमिन आसमानाचा फरक आहे. आमचं हिंदूत्व घरातील चूल पेटवणारं हिंदूत्व आहे. भाजपचं हिंदूत्व घर पेटवणारं आहे. ही माणसं दंगली घडवतात, आगी लावतात, घरं पेटवतात. घरं पेटवून भाजपवाल्यांच्या पोळ्या भाजतात आणि यात सामान्य माणसं मरतात.
पोलिसांचे फटके सामान्य माणसे खातात. सामान्य माणूस तुरुंगवास भोगतो. तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा, असे पंतप्रधान तुम्हाला पाहिजेत का? सर्व ठिकाणी शेतकरी पेटून उठले आहेत. कापसाला भाव नाही, सोयाबिनला भाव नाही. कांद्याची निर्यातबंदी अजून उठवत नाही. तुम्हाला आम्ही मतं का द्यायची, तुम्हीच सांगा. गुजरातची कांदा निर्यात बंदी तुम्ही उठवली पण महाराष्ट्राची कांदा निर्यात तुम्ही उठवली नाही.
जवळपास ११०० कोटी रुपयांचे कांदा उत्पादकांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. मग दहा वर्षात तुम्ही काय केलं, गवत उपटलं का? आम्ही महाराष्ट्रात उद्योगधंदे आणत होते, पण सर्व त्यांनी गुजरातला नेले. माझा धनुष्यबाण तुम्ही कलंकित करुन टाकला. धनुष्यबाण पेलण्याची हिंम्मत आहे का तुमच्याकडे? असा सवाल उपस्थित करुन उद्धव ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केला.