"उद्धव ठाकरेंना माझा बिनशर्त पाठिंबा..."; शपथपत्रातून सेनेची अस्तित्वासाठी लढाई

"उद्धव ठाकरेंना माझा बिनशर्त पाठिंबा..."; शपथपत्रातून सेनेची अस्तित्वासाठी लढाई

कायद्यासमोर देखील पक्षाचं आणि संघटनेचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान सेनेसमोर आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

शिवसेनेतून तब्बल 40 आमदार घेऊन तत्कालीन नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सरकारमधून बाहेर पडले आणि भाजपसोबत (BJP) जात त्यांनी सरकार स्थापन केलं. यामुळे मागच्या काही कालावधीमध्ये राज्यात मोठा राजकीय गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळाला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अन् राज्यात नवं सरकार आलं. त्यानंतर आता शिवसेनेमध्ये मात्र मोठी खळबळ निर्माण झाली असून, संघटना आणि पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान शिवसेना अन् विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यासमोर निर्माण झालं आहे. घराबाहेर पडत नाहीत अशी टीका ज्यांच्यावर होत होती, ते उद्धव ठाकरे आता पुन्हा एकदा सेनाभवनात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताना, बैठका घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडे कायद्यासमोर देखील पक्षाचं आणि संघटनेचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान सेनेसमोर आहे.

"उद्धव ठाकरेंना माझा बिनशर्त पाठिंबा..."; शपथपत्रातून सेनेची अस्तित्वासाठी लढाई
तामिळनाडुमध्येही ऑपरेशन लोटस! शशिकला होणार भाजपच्या 'एकनाथ शिंदे'?

शिवसेनेने एकीकडे बैठकांचं सत्र सुरु केलं असून, दुसरीकडे शिवसैनिकांकडून आता प्रतिज्ञापत्र सुद्धा लिहून घेतली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याकाळात शिवसेनेसोबत असणारे अनेक निष्ठावान आमदार आज पक्ष सोडून गेल्यानं पक्षातील कार्यकर्ते नेमके पक्षासोबत आहेत की नाही याची सुद्धा आता परिक्षा आगामी काळातील निवडणुकांमध्ये होणार आहे. एकीकडे केंद्रात सत्ता असलेल्या भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, तर दुसरीकडे पक्षातल्याच शिलेदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आपली वेगळी चूल मांडली. यामुळे आता शिवसेनेला पक्षाचा जिल्हाप्रमूख ते शाखाप्रमूख आणि शेवटच्या स्तरातील प्रत्येक कार्यकर्त्याची साथ असणं गरजेचं आहे. त्यासाठीच सेनेकडून सध्या बाँडपेपवर प्रतिज्ञापत्र लिहून घेतली जात आहेत. त्यामुळे एकीकडे शिवसेना संपणार नाही असं म्हणणारे ठाकरे दुसरीकडे संघटना वाचवण्यासाठी धडपडत असल्याचं पाहायला मिळतंय.

प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हटलंय?

"माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा व श्रध्दा आहे. तसेच वंदनीय हिंदह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्वांवर अढळ निष्ठा आहे.

मी असेही प्रतिज्ञापूर्वक सांगतो की, आदरणीय शिवसेनापक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांनी माझा बिनशर्त पाठींबा आहे.

आदरणीय शिवसेनापक्षाप्रमुख श्री. उध्दव ठाकरे यांच्या प्रती मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे आणि या निष्ठेची पुनश्च: पुष्टी करीत आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन याची या प्रतिज्ञापत्राद्वारे ग्वाही देत आहे." हे प्रतिज्ञापत्र आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख यांच्याकडून लिहून घेतले जात आहे. मात्र शिवसेनेची खरी परिक्षा ही आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्येच होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com