"मोफत मनोरंजन होतंय..."; राज यांच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरेंचा टोला
मुंबई : राज्यात सध्या वातावरण तापलं असून, एकीकडे ऊन वाढत असतानाच दुसरीकडे राजकीय घडामोडी देखील याला कारणीभूत आहेत. अवघ्या काही तासांत राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादची सभा सुरु होणार आहे. यापूर्वी राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्वाची (Hinduism) भूमिका आणि भोंग्याच्या मुद्यावरुन राज ठाकरे यांच्या सभा गाजत आहेत. तर राज ठाकरे यांचं हे हिंदुत्व नकली असल्याचा आरोप शिवसेनेकडून (Shivsena) होत आहेत. त्यातच आता थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज ठाकरेंच्या सभेवरुन टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी एका वृत्त समुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंवर टीका केली. हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या नव्या खेळाजडुंकडे आम्ही लक्ष देत नाही. हे खेळाडू यापुर्वी हे कसे आणि कुठे खेळले हे लोकांना माहिती आहे. कधी मराठीचा तर कधी हिंदुत्वाचा खेळ करणाऱ्या या नेत्यांना महाराष्ट्राने पाहिलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मनोरंजनाची अनेक माध्यमं बंद होती. त्यामुळे आता जर लोकांना मोफत मनोरंजन मिळणार असेल तर का नको? असा मिश्कील टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. एकुणच उद्धव ठाकरे यांनी देखील आता थेट मनसेविरुद्ध भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. यापूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीत देखील उद्धव ठाकरेंनी भाजपसह विरोधकांवर तुटून पडण्याचे आदेश कार्यकर्ते आणि नेत्यांना दिले आहेत.