संजय राऊत तुरुंगात; आता 'सामना' उद्धव ठाकरेंच्या हाती
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता एक नवी जबाबदारी स्विकारली आहे. पक्षाचे राज्यसभा खासदार आणि 'सामना' या मुखपत्राचे संपादक संजय राऊत तुरुंगात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ही जबाबदारी स्विकारली आहे. पत्रा चाळ घोटाळ्यात संजय राऊत यांना नुकतीच ईडीने अटक केली असून, ते सध्या कोठडीत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या संपादकपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंसमोर आता पक्ष टीकवण्याचं देखील आव्हान निर्माण झालं आहे. त्यातच पक्षाची तोफ समजल्या जाणाऱ्या संजय राऊतांना पत्रा चाळ घोटाळ्यात अटक केल्यानं ठाकरेना मोठा धक्का बसला आहे. अशा स्थितीत ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'ची कमान हातात घेतली आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना सामनाच्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
शुक्रवारी 'सामना' वृत्तपत्रात संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव लिहिलेलं दिसलं. 'सामना'चं संपादकपद आजवर ठाकरे कुटुंबाकडेच आहे. दुसरीकडे, राज्यसभा खासदार संजय राऊत यांना कार्यकारी संपादक करण्यात आलं आहे. राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’ १९८९ मध्ये सुरू झालं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम पाहिलं. 2012 मध्ये त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2019 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांनी संपादकपद सोडलं होतं. त्यांच्या ऐवजी रश्मी ठाकरेंची या पदावर वर्णी लागली होती.