Salman Khan House Firing : गोळीबार प्रकरणावर उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, "खुलेआम गुंडगिरी..."
Uddhav Thackeray Press Conference : सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेबाबत राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्धव ठाकरे यांनीही याबाबत मोठं विधान केलं आहे. "खुलेआम गुंडगिरी सुरु आहे. घटनाबाह्य सरकार चालवत आहेत. सत्ताधाऱ्यांना सरकार चालवायचा अधिकार नाही. तो कोण आहे? कुठून आला? कुणी गोळीबार केला? या सर्व गोष्टींवर या सरकारचं लक्ष नाही. कोणीही काहीही करतोय, तरीही यांना मत पाहिजे आहेत", असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली. ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
शिवसैनिकांच्या प्रवेशाबाबत उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, केंद्र सरकार बदलण्याच्या जिद्दीने येणाऱ्या मावळ्यांची संख्या वाढत आहे. या सर्वांचं मी शिवसेनेत स्वागत केलेलं आहे. संजोग वाघोले यांच्या मावळ मतदारसंघातील आणि पनवेलचे कार्यकर्ते शिवसेनेत आले आहेत. लीनाताई गरड, मधू पाटील यांच्यासह आणखी काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामे प्रसिद्ध केले जातात. अनेक अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आम्ही करु, असं सांगितलं जातं. पण मूळचे प्रश्न सोडवणं दूर राहतं. आणि भलत्याच प्रश्नांच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जाते. ही सर्व मंडळी शिवसेनेत आल्यावर त्यांच्या व्यथा आहेत, त्या एकट्याच्या नाहीत. इथल्या प्रश्नांबाबत अनेक आंदोलने झाली आहे. डबल मालमत्ता कर लावला जातोय. सिडकोकडून कर वसुली केली जाते.
ठाकरे पुढं म्हणाले, महापालिकेकडून कोणत्याही सेवा न देता कर आकारला जातो. ही जुलूमशाही आहे. त्याच्याविरोधात २ लाख ८० हजार जनतेनं कित्येक महिने निषेध केला आहे. हा कर जबरदस्तीने वसूल केला जातो. कल्याण-डोंबिवलीतील लोढांच्या पलावा सिटीला करमुक्ती केली आहे. या विषमतेबद्दस तिथले नागरिक सातत्याने आवाज उठवत आहेत.
मुंबई महापालिकेत २०१७ ला निवडणूक लढवताना मी मुंबईकरांना वचन दिलं होतं की, ५०० स्केअर फुटापर्यंत ज्यांची मालमत्ता आहे, त्यांना मालमत्ता कर आम्ही रद्द करू आणि तो मी करुन दाखवला. केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आल्यावर हा दुहेरी कराच्या फटक्यातून आम्ही तुम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाहीत. कर भरणार नाही, अशी कुणाची भूमिका नाही. पण या वसुली सरकारने डबल कर आकारून विचित्र कारभार सुरु केला आहे.
हा प्रकार आम्ही नक्की थांबवू, असं वचन मी या नागरिकांना देतो. हा मावळ मतदारसंघ जेव्हापासून निर्माण झाला, तेव्हापासून इथे शिवसेनेचं प्राबल्य आहे. संजोग वाघेरेसांरखा लढवय्या उमेदवार पूर्ण ताकदीने तिकडे लढतो आहे. आता पनवेलमध्ये आम्ही मागे राहणार नाही, पण प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चार पावले आम्ही पुढं जाऊ, असा विश्वास आहे. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई सुरु केली आहे, असंही ठाकरे म्हणाले.
शिवसेना पुत्रप्रेमामुळे फुटली, असं अमित शहा यांनी म्हटलंय, यावर बोलताना ठाकरे म्हणाले, अमित शहांना मला इतकच सांगायचंय, तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे. तसं पुत्रप्रेम मी दाखवलेलं नाही. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते, मी पुन्हा येईन. त्यानंतर ते दोन पक्ष फोडून आले. मविआच्या सभेबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, काँग्रेसच्या काही जागा घोषित करण्याचं बाकी आहे. ते एक दोन दिवसात होईल. आम्ही राज्यासाठी वेगळ्या विषयांसाठी वचननामा घ्यायचा का, कोणते मुद्दे घ्यायचे, ते येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होईल.